ग्रामपंचायतीचा निर्णय, वाणिज्यिक आस्थापंनांमधील सर्वांची होणार अँटिजन टेस्ट
गुहागर : तालुक्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शृंगारतळीही तालुक्यातील मध्यवर्ती, मोठी बाजारपेठ असल्याने येथे सातत्याने गर्दी असते. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात चार दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने घेतला आहे. या कालावधीत सर्व व्यापारी आणि वाणिज्यिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्टही करण्यात येणार आहे. अशी माहिती सरपंच संजय पवार यांनी दिली.
गुहागर तालुक्यात गेले 15 दिवस कोरोनाग्रस्तांचे प्रमाण वाढले आहे. गुहागर तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचे गाव म्हणून श्रृंगारतळीकडे पाहिले जाते. श्रृंगारतळी बाजारपेठ मध्यवर्ती आणि मोठी असल्याने येथे तालुक्यातील जनता खरेदीसाठी येते. स्थानिकांनी नियम पाळण्याचा प्रयत्न केला तरी तालुक्यातून येणारे ग्रामस्थ, टाळता न येणारी गर्दी, सामाजिक अंतराच्या भान न राखणे आदी कारणांमुळे कोरोना संक्रमणाचा हॉटस्पॉट म्हणून शृंगारतळी ओळखले जावू लागले. कोरानाग्रस्तांची संख्या वाढणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर संक्रमण रोखण्यासाठी शृंगारतळीमधील व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीला व तालुका प्रशासनाला सहकार्य करत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी तीनवेळा घेतला. त्याचा चांगला परिणामही दिसून आला.
गणेशोत्सवानंतर तालुक्यात वाढणारे संक्रमण लक्षात घेवून पुन्हा एकदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्र बंद करण्याचा कठोर निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. विचार विनिमय करुन ग्रामपंचायतीने 11 सप्टेंबर पासून 4 दिवस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात लॉकडाऊन घोषित केला आहे. सुरवातीला बाजारपेठ बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. मात्र बुधवारी (ता. 9) ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार सौ. लता धोत्रे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, नासीमशेठ मालाणी, अनंत चव्हाण, पाटपन्हाळे पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, महेश कोळवणकर, प्रसाद संसारे आदी व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीनंतर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.
याबाबत सरपंच संजय पवार म्हणाले की, पाटपन्हाळे ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेमुळे येथील प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. ग्रामपंचायतीने कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे गेली काही महिने शृंगारतळीमध्ये कोरोनाचा शिरकाव दिसत नव्हता. याबद्दल पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनाचे अनेक रुग्ण शृंगारतळी परिसरात आढळून आले आहेत. आता ग्रामपंचायत, दुकाने, बँकांमध्येही कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शृंगारतळी बाजारपेठ दि. 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत सर्व व्यापारी व त्यांचे कर्मचारी यांनी अॅटिजेन टेस्ट करावयाची आहे. जो व्यापारी किंवा कर्मचारी ही तपासणी करणार नाही, त्यांची नावे प्रशासनाला कळविण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी सरपंच संजय पवार यांनी केले.