गुहागर : पुत्रप्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात आपले पुत्र योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. हा हक्कभंग नव्हता का. असा सवाल राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांचे विरोधात दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याची टीकाही माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे.
दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी खा. सुनील तटकरे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे 20 ऑक्टोबर रोजी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार संजय कदम म्हणाले की, दापोली विधानसभा मतदारसंघात साधे ग्रामपंचायत सदस्य ही नसताना ते भूमिपूजन करत सुटले होते. वडील मंत्री असल्याने अनेक शासकीय भूमिपूजन फलकावर त्यांचे नाव टाकण्यात आले होते. हा हक्कभंग होत नाही का ? यापूर्वी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री ऊठसूट माझ्या दापोली मतदारसंघांमध्ये नाक खुपसत होते, तेव्हा हक्कभंग होत नव्हता का ? गेली पाच वर्ष स्थानिक आमदार म्हणून आपल्याला डावलले जात होते, तेव्हा प्रोटोकॉल कुठे होता ? असे प्रश्र्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
ते पुढे म्हणाले की, आंबेत म्हाप्रळ पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव आपल्या कारकिर्दीत पाठविण्यात आला होता. त्याचा वारंवार पाठपुरावा सुद्धा आपण केला होता. आता राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. मग महाविकास आघाडीतील एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने जर विकास कामाचे भूमिपूजन केली तर बिघडले कुठे. रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मतदारसंघातील अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली तर बिघडले कुठे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करायची नाहीत का.
आमदार योगेश कदम यांनी केवळ एकच पावसाळा बघितला आहे, तर आताच ते हक्कभंगाची भाषा करू लागले आहेत. लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून मोठी चूक केली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार गुण्यागोविंदाने नांदत आहे. परंतु स्थानिक पातळीवर जुळवून घेण्याऐवजी कुरघोडी करण्याचे काम सुरू आहे. हे जनतेपासून लपून राहिले नाही. स्थानिक खासदार सुनील तटकरे यांचे विरोधात आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर करणे म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे .