रत्नागिरी रिफायनरी समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे
ॲडव्होकेट शशिकांत सुतार (अध्यक्ष – रत्नागिरी रिफायनरी समन्वय समिती, अध्यक्ष – राजापूर तालुका बार असोशिएशन मोबाईल क्रमांक : ९६३७५६०९९९) यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे.
सन्माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांसी,
“क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, करावया तव मंगल पूजा, हे दशरथ पुजारी यांचे आज भक्तीगीत आठवले आणि त्याचे कारण म्हणजे रत्नागिरी ग्रीन रिफायनरी.
ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना २०१७ मध्ये काढण्यात आली आणि तेथूनच सूरु झाली एक रिफायनरीची गोष्ट. नाणार रिफायनरी अशा नावाने मिडीयाने त्याचे नामकरण केले. सुरूवातीला त्याचे स्वागत सर्वच पक्षांनी, संघटनांनी केले होते. मात्र त्यानंतर विकासविरोधी एनजीओंकडून इथल्या स्थानिक कथित पुढाऱ्यांना हाताशी धरून स्थानिकांमध्ये प्रकल्पाविषयी अत्यंत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन स्थानिकांमध्ये प्रकल्पविरोधी गैरसमज पसरविण्यात आले. त्यामध्ये पुन्हा पक्षीय राजकारणे आले आणि विरोधाची धार अधिक बळकट झाली. शेवटी त्याची परिणती रिफायनरीची अधिसूचना रद्द करण्यात झाली. रिफायनरीची अधिसूचना रद्द असताना ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा विरोध दर्शविला गेला त्या प्रमाणात रिफायनरीचे समर्थन दिसून आले नाही. तरीदेखील त्यावेळी समर्थन काही प्रमाणात चालू होते. मात्र दरम्यानच्या काळात विविध शास्त्रीय माध्यमांद्वारे व सर्वेक्षणातून व पूर्ण अभ्यासाअंती रिफायनरीमधून कोणत्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही असा निर्वाळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ आयटीसीचे प्रमुख जी डी यादव यांनी दिला. त्याचवेळी प्रस्तावित रिफायनरीमुळे कोकणातील कोणताही आंबा व काजू बागायतदार, मच्छिमार उध्वस्त होणार नाही, कमीत कमी लोकांचे विस्थापन होईल, मंदिरे जाणार नाहीत, बागायती जाणार नाहीत यासारख्या अनेक अत्यंत महत्वाच्या विषयांवर जेव्हा प्रबोधन झाले व त्याची संपूर्ण माहिती ज्यावेळी विरोधकांना मिळाली त्याचवेळी मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाला समर्थन सुरू झाले.
पूर्वी विरोधकांनी ज्या ज्या मुद्यांवर विरोध केला ते सर्व मुद्दे व आक्षेप कसे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत हे कळीत झाल्यामुळेच सर्व स्तरातील जनता यामध्ये व्यापारी, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, आंबाकाजू बागायतदार, मच्छिमार, विविध सामाजिक,सांस्कृतिक, अनेक स्तरांतून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला समर्थन मिळू लागले आहे व मिळत आहे.
प्रस्तावित प्रकल्पाला झालेला विविध मुद्द्यावरील विरोध लक्षात घेऊन पूर्वीचे जागेमध्ये बदल करून सुधारित आराखडा तयार केला गेला आहे की ज्यामध्ये केवळ २० टक्के आंबा लागवड जमीन, जंगली जमीन १० टक्के व अन्य मोकळे निव्वळ कातळ पडजमीन ७० टक्के असून यामुळे स्थानिकांचे कोणतेही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन सुधारित आराखडा तयार केला आहे .ज्याची माहिती शासनाकडे आहे. प्रस्तुत रिफायनरी प्रकल्पामुळे आपल्या तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये क्रांतीकारी बदल होणार असून त्यामधून स्थानिकांचा सर्वात मोठा यक्षप्रश्न बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच शैक्षणिक, आरोग्य सुविधा, सर्व प्रकारची कॉलेजेस्, शहराचा सर्वांगीण विकास , थेट रोजगार, महाराष्ट्र शासनाचे वाढणारे हजारो कोटींचे कर उत्पन्न, देशाचा व महाराष्ट्र सरकारचा वाढणारा जीडीपी दर, संपूर्ण राज्यात मिळणारा रोजगार, महिलांचे सक्षमीकरण, बचतगटांना उद्योग, तरूणांना प्रशिक्षण अशा अनेक प्रकारे केवळ फायदे अन् फायदेच होणार आहेत.
सर्वात महत्वाची गोष्ट तरूणांनी विचारात घेणे आवश्यक आहे. भारताच्या ऑईल क्षेत्रातील कंपन्यांनी भारत सरकारच्या स्किम डेव्हलपमेंट योजनेंतर्गत मे २०१६ मध्ये एसडीआय भुवनेश्वर या नावाने प्रचलित कौशल्य विकास संस्थेचे उद्घाटन भुवनेश्वर येथे केले. ऑईल इंडस्ट्री तसेच इतर इंडस्ट्रिजना प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविणे हा या संस्थेचा मूळ उद्देश आहे. दहा वर्षात पन्नास हजार युवकांना प्रशिक्षित करून वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये त्यांची नेमणूक करणे या उद्देशाने ही संस्था आता कार्यरत आहे. त्याच धर्तीवर इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियमची जॉईंट व्हेंचर असलेल्या रत्नागिरी रिफायनरी कंपनीने देखील कोकणातील स्थानिक युवकांना प्रशिक्षणदेऊन अशा स्वरूपांच्या नोक-या, व्यवसाय उपलब्धतेची संधी कोकणात दिली होती, जी अधिसूचना रद्द झाल्यामुळे आपण गमावली. मात्र तीच एवढी मोठी सुवर्णसंधी आपल्या कोकणातल्या सर्व तरूणांना, बेरोजगारांना व विद्याथ्यांना पुन्हा मिळू शकते मात्र त्यासाठी पुन्हा एकदा रिफायनरी अधिसूचना शासनाने काढणे आवश्यक झाले आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्यासह आपल्या पुढच्या पिढीच्या विकासासाठी विकासपुरूष बनणे गरजेचे आहे.
मात्र अधिसूचना रद्द झाल्यामुळे आपण विकासाची, रोजगार, तंत्रकुशलता प्राप्त करण्याची, अत्याधुनिक आरोग्य सुविधेची, उच्च तंत्रशिक्षणाची, वैद्यकीय, इंजिनियर शिक्षणाची, विकासाची संधी कोकणातील युवकांनी मात्र या साडेचार वर्षात गमावली आहे. यासाठी व तमाम ‘कोकणवासियांनी पुढील पिढीचे भविष्याचा विचार करून सध्या बेरोजगार तरुणांना मिळणारा रोजगार व त्यामुळे भविष्यकालीन सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीची भारताला नितांत व निकडीची गरज आहे.
मागील साडेचार वर्षात विरोधकांना साथ देणाऱ्या लोकांना विरोधकांनी किती रोजगार उपलब्ध करून दिले, पर्यावरण पूरक उपक्रम आणले का, किती उद्योगधंदे निर्माण केले, किती युवकांना नोकऱ्या दिल्या याचा विचार आपण करणार आहोत की नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये देखील असेच घडले याची जाणीवर ठेवून व सर्वांना जागे करण्याची हीच ती वेळ व हाच तो क्षण असे म्हणून सर्व समर्थक एकत्र येऊन रद्द झालेली किंबहुना केलेली रिफायनरीची अधिसूचना काढण्यात यावी ही मागणी घेऊन आम्ही सर्व समर्थक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी धडपडत आहोत पण या ना त्या मार्गाने नकारघंटा वाजविली जात आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आम्हाला भेटू दिले जात नाहीच पण आता आम्ही भेटणारच. उध्दव ठाकरे हे जसे विरोधकांचे तसेच समर्थकांचे व तमाम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आपणाला माहितच आहे प्रत्यक्षात देव आहे की नाही. मला विचाराल तर देव अस्तित्वात आहे आणि देवाला केलेली मनापासूनची प्रार्थना देवाला ऐकायला जातेच आणि म्हणूनच मुख्यमंत्री उघ्दव ठाकरे याना मी एवढंच म्हणेन क्षणभर उघड नयन देवा…फक्त एकच क्षण….!
आपण संपूर्ण महाराष्ट्राचे अत्यंत लाडके मुख्यमंत्री आहात. सृजनशील आहात. नेहमी तुम्ही जनतेसोबत आहात असे सांगितले आणि आपण हेही सांगितले की जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा असेल तर पुन्हा करार करू. आणि म्हणूनच आपण अतिशय हळव्या मनाचे, अत्यंत संवेदनशील व जनतेप्रती अतिशय जिव्हाळा व प्रेम असलेले व्यक्तिमत्व असल्याने तुम्ही विरोधकांचे म्हणणे त्यावेळी ऐकून घेऊन निर्णय घेतलात. अगदी तसेच आम्हा सर्व समर्थकांचे सविस्तर म्हणणे ऐकून घ्या. तात्काळ रिफायनरीची अधिसूचना काढण्याबाबत पुनर्विचार करून तालुक्यात कुठेही रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प निर्माण करावा अशी तमाम जनतेची व राजापूर तालुकावासीयांची मागणी आहे.