राष्ट्र सेविका सेमितीच्या 63 महिलांचे पोलीसांना निवेदन
गुहागर, ता. 17 : अभिनेते महेश मांजरेकर दिग्दर्शित “नाय वरनभात लोन्चा, कोण नाय कोन्चा” या चित्रपटातील महिला व अल्पवयीन मुलांचे बीभत्स संवाद आणि दृष्ये काढून टाकण्यात यावीत. तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होवू नये यासाठी उचित कार्यवाही करावी आणि महिलांचा अपमान थांबवावा. अशी विनंती राष्ट्र सेविका समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी गुहागर पोलीसांना केली आहे. (Remove offensive part from movie)
नाटककार जयंत पवार यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर लिहिलेल्या कथेवर, नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा हा चित्रपट आधारीत आहे. याचे संवादलेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिध्द झाल्यावर विरोधाला सुरवात झाली. राष्ट्रीय महिला आयोगाने चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. आता राष्ट्र सेविका समितीच्या गंगामाता शाखेने गुहागर पोलीस ठाण्यातही चित्रपटाचे प्रसारण रोखण्याबाबत निवेदन दिले आहे. (Remove offensive part from movie)
63 महिलांनी सह्या केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, चित्रपट हे समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. पण नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा या चित्रपटामध्ये पौगंडावस्थेतील मुलांच्या तोंडी अश्लील भाषा व अंगविक्षेप करणारी दृश्ये दाखविली आहेत. महिला व पुरुषांचे अत्यंत आक्षेपार्ह वर्तन, बीभत्स व उत्तान अंगप्रदर्शन दाखविणारी दृश्ये चित्रित केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चित्रपटातील अशा दृष्यांचे ट्रेलर माध्यमांद्वार प्रसिध्द केले जात आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांपर्यंत या सर्व गोष्टी सहजतेने पोचत आहेत. पालक म्हणून ही बाब अत्यंत गंभीर आहे. अश्या अश्लील दृश्यफितीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. किंबहुना त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. (Remove offensive part from movie)
समाज आणि संस्कृती यांचे संवर्धन करणारा एक दक्ष आणि सहृदय घटक या नात्याने राष्ट्र सेविका समिती, गंगामाता शाखा, गुहागर मधील महिलांचा ‘नाय वरण भात लोंच्या कोन नाय कोंच्या’ या चित्रपटातील बीभत्स प्रदर्शनाला आक्षेप आहे. यावर संबंधितांनी वेळीच योग्य ती कार्यवाही करावी. महिलांचा अपमान आणि विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम थांबावेत. (Remove offensive part from movie)