पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांची गुहागर भेट
गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसांच्या कामाला सागरी सुरक्षेचा एक वेगळा आयाम आहे. इथे येवून सागरी सुरक्षेविषयी मला स्वत:ला खूप काही शिकायला मिळणार आहे. लोकांची साथ असेल तर छोट्या समस्या आपण चटकन सोडवू शकतो. असे प्रतिपादन रत्नागिरीचे नवे पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केले. ते गुहागर पोलीस ठाण्याला भेट देण्यासाठी आले होते.
गुहागर पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी इथे काही समस्या आहेत का अशी चौकशी गर्ग यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गर्ग म्हणाले की, सागरी सुरक्षेच्या विषयात अधिक काम करण्याची माझी इच्छा आहे. येथील सागरी रस्त्यांवर पेट्रोलिंग कसे वाढवता येईल. समुद्रकिनाऱ्यांवरील गावांमध्ये सुरक्षेविषयी कसे काम करता येईल. याचा विचार मी करत आहे. म्हणूनच जिल्हातील पहिल्याच दौऱ्यात मोठा कार्यभार असणाऱ्या पोलीस ठाण्यांना भेटी देण्याऐवजी सागरी किनाऱ्यांवरील पोलीस ठाण्यांचे कामकाज समजून घेण्याला मी प्राधान्य दिले आहे.
गडचिरोली सारख्या नक्षल चळवळींनी त्रस्त भागातही लोकांना सोबत घेतल्याने ही चळवळ नियंत्रणात आणण्यामध्ये मला यश मिळाले आहे. तोच फॉर्म्युला इथेही वापरण्याचा विचार मी करतोय. इथे आल्यावर अनेक लोकांना भेटलो. तेव्हा येथील लोक छान आहेत. मदत करणाऱ्या स्वभावाचे आहेत. हे लक्षात आले आहे. अशा लोकांना सोबत घेवून पोलीसांनी काम केल्यास जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अधिक चांगली होवू शकते. असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
गुहागर तालुक्यातील सागरी सुरेक्षेमध्ये काम करणारी यंत्रणा ठप्प आहे. सागरी सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा तालुक्यात नाहीत. याबाबत बोलताना गर्ग म्हणाले की, नवी यंत्रणा उभी करायची असेल तर निधी आवश्यक असतो. गेले सहा महिने आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करतोय. राज्याचा महसुल कमी झालाय. त्यामुळे नव्याने काही उभे राहील अशी अपेक्षा आज करणे योग्य ठरणार नाही. मात्र सुरक्षेच्या मुद्द्यांशी तडजोड न करता उपलब्ध मनुष्यबळ आणि सुविधांमध्ये काय करता येईल याचा आपण विचार करु. पत्रकारांजवळ संवाद साधल्यानंतर पोलीस अधिक्षक यांनी गुहागर तालुक्यातील पोलीस पाटील यांचीही भेट घेतली.
(या भेटीचा व्हिडिओ पहा…….)
——-