02.09.2020
गुहागर : अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर बुधवारी (ता. 2) मत्स्याहारी लोकांचे पाय स्वाभाविकपणे मच्छीमार्केटकडे वळले. त्याचाच फायदा घेवून गुहागर समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभुमीशेजारी मंडलीवर मच्छीमारांनी आपल्या होड्या लावून ताजी मच्छी विकायला सुरवात गेली. याची माहिती गुहागर शहरवासीयांना मिळाल्यानंतर मंडलीला जत्रेच स्वरुप आले होते.
कोकणात भाद्रपद महिन्यात घरोघरी गणपती बाप्पांची प्रतिष्ठान होते. त्यामुळे श्रावणापासून गणपती जाईपर्यंत साधारणपणे घरी कोणीही मांसाहार करत नाही. अपवाद असतो तो गौरी हौसतात त्या दिवशी तिखट्या नैवेद्याचा. हा नैवेद्य देखील घराबाहेरील चुलीवर तयार केला जातो. अनंत चतुदर्शीला गणपती विसर्जन झाले की पौर्णिमेचा एक दिवस मोकळा असतो. दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष सुरु होत असल्याने घराघरात अनसुट, पक्ष असतात. त्यानंतर अनेकांच्या घरात नवरात्र बसते. त्यामुळे मासांहार केला जात नाही.
यावेळी मंगळवारी विसर्जन झाल्यानंतर बुधवार आला त्यामुळे तर मत्स्याहार व मांसाहार प्रेमींची चंगळ झाली. हीच संधी साधुन असगोलीतील मच्छीमारांनी पहाटे समुद्रात होड्या सोडल्या. पहाटे ५ ते सकाळी 10 या वेळात पकडलेली मच्छी घेवून होड्या मंडलीवर लावल्या. ताजे मासे विक्रीला आलेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गुहागर शहरासह आरेगाव पासून शृंगारतळीपर्यंतची अनेक मंडळी ताजे मासे खरेदी करण्यासाठी मंडलीवर आली होती. त्यामुळे आज मंडलील मत्स्यजत्रेचे स्वरुप आले होते.
मच्छीमारांना कोळंबी (व्हाईट आणि चालू) , सौंदाडा, मांदेली, ढोमा, शेवंड, बांगडा, मुशी, बोंबील, पापलेट अशी मच्छी मिळाली. यामध्ये कोळंबी व सौंदाड जातीची मच्छी जास्त होती. विक्री करुन राहीलेली मच्छी विकत घेण्यासाठी मच्छी व्यापाऱ्यांनीही दुपारी आपला मोर्चा मंडलीकडे वळवला. साधारणपणे 150 किलो कोळंबी (व्हाईट) प्रति किलो ५०० रु. दरांने, तर सुमारे 300 किलो सौंदाड प्रतिकिलो 220 रु दराने व्यापाऱ्यांनी विकत घेतले. चार महिन्यांनंतर प्रथमच मोठी उलाढाल झाल्याने समाधानी असल्याची प्रतिक्रिया येथील तांडेल तसेच मच्छी विक्रेत्या महिलांनी व्यक्त केली.