गुहागर, ता. 26 : तालुक्यातील उमराठ गावाप्रमाणेच साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे या गावातील सामाजिक सलोखा तुटणार काय असा प्रश्र्न निर्माण झाला होता. मात्र या समाजाने गावाशी असलेली बांधिलकी जपत सरपंच पदाचा आग्रह सोडला. परिणामी ग्रामपंचायत स्थापनेपासून निवडणूक न करण्याची परंपरा कायम राहीली आहे.
साखरीआगर गावातील दोन प्रभागांमधून एकाच समाजाचे 5 ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे असतात. तर उर्वरित 4 सदस्यांपैकी 1 सदस्य प्रभाग 2 मधून व 3 सदस्य प्रभाग 3 मधून निवडून द्यायचे असतात. निवडणुकीपूर्वी दोन वेळा गाव एकत्र बसतो आणि सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची नावे निश्चित केली जातात. सरपंच पद आळीपाळीने एकेका समाजाला दिले जाते. अशी परंपरा या गावाने 1959 पासून जपली होती.
यावर्षी साखरीआगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची संधी भंडारी समाजाला होती. मात्र गावातील बहुसंख्येने असलेल्या समाजाने निवडणुकीसाठी झालेल्या पहिल्या गावकीत सरपंच आमचाच असला पाहिजे असा हट्ट धरला. बैठकीत या समाजाला समजाविण्याचा प्रयत्न झाला. मात्र समाजाच्या पुढाऱ्यांनी जेथे आपली लोकसंख्या जास्त तेथे आपलाच सरपंच झाला पाहिजे असा आग्रह आमच्याकडे केला आहे. समाजाच्या बैठकीत आपल्या समाजाचे जास्त सरपंच निवडून आणण्याचे ठरले आहे. असे सांगत गावातील बहुसंख्य समाजाची मंडळी आपल्या भूमिकेवर ठाम राहीली. त्यामुळे पेच निर्माण झाला.
अखेर अन्य सर्व समाजांनी विचार करुन ग्रामपंचायत बिनविरोधच करायची. सर्वच (9) ग्रामपंचायत सदस्य तुम्ही निवडून आणा. आम्ही अन्य प्रभागात देखील उमेदवार उभे करणार नाही. निवडणूक लागली तर मतदानही करणार नाही. अशी भूमिका घेत ग्रामपंचायतीच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. या निर्णयानंतर गावकीची पहिली बैठक संपली.
बैठकीनंतर अन्य समाजातील ग्रामस्थांनी साखरीआगरची ग्रामपंचायत बिनविरोधच करायची पण आपण उमेदवारच द्यायचा नाही. हा निर्णय सर्वांपर्यंत पोचविला. गावातील वातावरण गढुळ झाले होते. बहुसंख्येने असलेल्या समाजाचे अन्य समाजांशी असलेल्या नात्यात अदृष्य दरी निर्माण झाली होती. निवडणूक होवून जाईल पण गावात राहून एकमेकांमध्ये निर्माण होणारा दुरावा कायम रहाणार होता. त्यामुळे या समाजातील काही समजुतदार मंडळींनी आपल्या समाजाच्या पुढाऱ्यांपर्यंत विषय नेला. या आधी सर्वाधिक वेळा आपल्याच समाजाचा सरपंच झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले. समाजाच्या पुढाऱ्यांनी देखील परिस्थिती समजून घेवून साखरीआगरमधील समाजाने गावाचा विचार करावा असा सल्ला दिला. गावातील बहुसंख्य समाजाच्या पुढाऱ्यांवरील ताण कमी झाला. परंतु गावात येवून पुन्हा गावाला बोलावण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आली होती. मान अपमान बाजुला ठेवून या मंडळींनी गावातील काहीजणांशी संपर्क साधला. पुन्हा एकदा गावकी घेण्याबाबत चर्चा केली.
त्याप्रमाणे शनिवार (ता. 26) दुपारी साखरीआगर गावात पुन्हा एकदा निवडणुकीवर विचार करण्यासाठी गावकीची सभा झाली. आजच्या बैठकीला सुमारे 70 ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील सामाजिक सलोखा कायम राहीला पाहिजे. आधी गावाची बांधिलकी मग तालुक्यातील समाज असा विचार बहुसंख्येने असलेल्या समाजाच्या पुढाऱ्यांनी मांडला. त्याचे गावाने स्वागत केले. पुन्हा जुन्या सुत्राप्रमाणे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला. गेल्या 70 वर्षांची ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आणण्याची परंपरा अशारितीने कायम राखली गेली आहे.