कौटुंबिक कलहामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द धोक्यात ?
बॉलीवूडमधील गायिका रेणू अशोक शर्मा हीने महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार ओशिवरा पोलीसा ठाण्यात 10 जानेवारी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह महिला मोर्चाने धनंजय मुंडेंच्या राजिनाम्याची मागणी केली आहे. तर काँग्रेस पक्षाने ही मुंडेंची अंतर्गत बाब असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या तरी धनजंय मुंडे यांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय. तर शिवसेनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
(काय आहे धनंजय मुंडे, रेणू शर्मा प्रकरण. वाचा एकाच बातमीत)
रेणू शर्मांनी केलेली धनंजय मुंडे विरुध्द केलेली तक्रार
ओशिवरा पोलीस ठाण्यात हिंदी भाषेत केलेल्या तक्रारीत रेणू अशोक शर्मा या अविवाहीत महिलेने म्हटले आहे की, माझे जिजा धनंजय पंडितराव मुंडे यांनी विवाहाने आश्र्वासन देवून माझ्यावर बलात्कार केला. मला धोका दिला आहे. माझी आणि त्याची पहिली ओळख 1997 मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथे माझी बहीण करुणा हीच्या घरी झाली. त्यावेळी माझे वय 16 -17 वर्ष होते. माझी बहिण करुणा हिचा 1998 मध्ये धनंजय पंडितराव मुंडे यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला होता. 2006 मध्ये माझी बहिण करुणा प्रसुती नंतर इंदौरला रहायला गेली. त्यावेळी मी घरी एकटी असल्याचे त्यांना माहिती होते. तेव्हा न विचारता रात्री ते घरी आणि माझी इच्छा नसताना त्यांनी संबंध ठेवले. असे दोन तीन वेळा ते माझ्याकडे आले. त्यांनी सदर कृत्याचा व्हिडिओ केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे मला सतत फोन करुन प्रेमाच्या गोष्टी बोलत. त्यांनी मला सांगितले की, तुला गायिका बनायचे असेल तर, मी सीनेसृष्टीतील मोठ्या चित्रपट निर्देशन, चित्रपट निर्मात्यांशी भेट घडवून बॉलिवूड मध्ये तुला लाँच करेन. अशी लालुच दाखत ते माझ्यावर जबरस्तीने, माझ्या इच्छेविरुध्द संबंध ठेवून माझे लैंगिक शोषण करत होते. जेव्हा माझी बहिण करुणा एखाद्या कामाला बाहेर जायची तेव्हा देखील ते माझ्याकडे मागणी करायचे.
10 जानेवारीला रेणू शर्मांनी केलेली तक्रार ओशिवरा पोलीसांनी 11 जानेवारीला स्विकारली. रेणू शर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन या तक्रारीची माहिती दिल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. समाज माध्यमांवरुन चर्चा सुरु झाली. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली. या पोस्टनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले.
काय म्हणाले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
12 जानेवारीला सायंकाळी 5.27 वा. धनंजय मुंडे यांनी फेसबुक टाकलेली पोस्ट जशीच्या तशी –
#समाजमाध्यमांमध्ये_माझ्या_विरुध्द_होणारे_आरोप
#पूर्णपणे_खोटे_बदनामी_आणि_ब्लॅकमेल_करणारे_आहेत
कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.
करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत. मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. या बाबत दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी मा. उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी मा. उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी मा. उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे.
तथापि कालपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, व श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे. माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये मागितल्याचे sms रुपी पुरावे आहेत. तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो. मला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधीतांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल तथापी माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी कारण सदर प्रकरणी श्रीमती करूना शर्मा यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी 2 अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.
राजकारण ढवळून निघाले
ही पोस्ट आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातून रेणू शर्मा हे प्रकरण बाजुला राहीले असून धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांची दोन मुले, निवडणुकीत लपवून ठेवलेली माहिती, आदी विषयांवरच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हिंदू कायद्यानुसार दुसरे लग्न बेकायदेशीर, दोन पेक्षा जास्त मुले असणाऱ्या व्यक्तिला लोकप्रतिनिधी होण्याचा हक्क नाही हे मुद्दे यातून चर्चिले जात आहेत.
भाजपने केली राजीनाम्याची मागणी
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष सौ. उमा खापरे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सौ. खापरे म्हणाल्या की, मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कायद्यानुसार मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरतील. भाजपच्या सौ. खापरे यांची प्रतिक्रिया आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली. चंद्रकात पाटील यांनी ट्विट केले आले की, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भाजप महिला शाखेच्या वतीने राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करुन मुंडेंचा राजीनाम घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
महाविकास आघाडीची सावध भूमिका
राष्ट्रवादी पक्षाकडून या प्रकरणात सावध भूमिका घेतली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर येथील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडे प्रकरणाबाबत ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले की, एखादी तक्रार झाली तर चौकशी होतेच. चौकशीनंतरच काय ते समोर येईल. आत्ता त्यावर फार काही बोलू शकणार नाही. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांनी किती नैतिकता पाळली होती असा प्रश्र्न उपस्थित करुन धनंजय मुंडे प्रकरणावर बोलायचे टाळले.
काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी सर्व खुलासे केले आहेत. त्यामुळे आता इतरांनी त्यावर बोलणे योग्य नाही.
शिवसेना नेते म्हणतात नो कॉमेंटस्
महाविकास आघाडीच्या सत्तेत महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेदेखील सावध पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेमकी काय भूमिका घेते याकडे शिवसेना नेत्यांचे लक्ष लागून राहीले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता नो काँमेंटस् म्हणत उत्तर देणे टाळले.
धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे राजकारणात आले. बीड जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्याची राजकीय कारकीर्द सुरु झाली. पुढे भाजपा युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्षही होते. कै. गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आमदार करावे. आपला राजकीय वारसदार बनवावे. अशी धनंजय मुंडे यांचे वडिल पंडितअण्णा मुंडेंची इच्छा होती. त्यातच परळी येथील साखर कारखान्यावरील सत्तेतून वाद वाढेल ते अखेर शिगेला पोचले. आणि पंडित अण्णा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेथून बीड जिल्ह्यात मुंडे विरुध्द मुंडे असे राजकारण सुरु झाले. राष्ट्रवादीने या युवा नेत्याला आमदार बनवले. विरोधी पक्षनेते बनविले. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश झालेले धनंजय मुंडे अजितदादा, शरद पवार यांच्या मर्जीतील नेते बनले. 2019 च्या निवडणूकीनंतर धनंजय मुंडेंना सामाजिक न्याय खात्याचे मंत्रीपद देण्यात आले.
राजकीय कारकिर्द धोक्यात
रेणू अशोक शर्मा यांच्या आरोपांपेक्षा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे. त्यांनी स्वत:हून करुणा शर्मासोबतच्या नात्याची कबुली दिली. शिवाय दोन अपत्य असल्याचेही सांगितले. विरोधक याच गोष्टींचा बाऊ करणार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची कोंडी करणार. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय स्थान डळमळीत झाल्याशिवाय रहाणार नाही. अशी अटकळ सध्या राजकीय वर्तुळात मांडली जात आहे.