दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा
गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16 दिव्यांगांसाठी नगरपंचायतीतर्फे रिक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गुहागर खालचापाट येथील रिक्षा व्यावसायिक पराग कमळाकार भोसले यांनी कोणतेही शुल्क न घेता सर्व दिव्यांग व्यक्तींना मोफत रिक्षा उपलब्ध करून दिली. भोसले यांच्या कोरोना काळातील या कामगिरीबद्दल सर्वस्थरातून कौतुक होत आहे.
The city on Thursday vaccinated people with disabilities over the age of 45. Rickshaw dealer Parag Kamlakar Bhosale from Khalchapat provided free rickshaws to all persons with disabilities free of cost. His performances during the Corona period have been widely praised.
खालचापाट येथील पराग भोसले हे गेली 25 वर्षे रिक्षा व्यवसाय करत आहेत. भोसले हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतात. गतवर्षी दापोली तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्यावेळी खालचापाट येथील तरुणांसोबत जाऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याच्या कामातही त्यांचा हातभात होता. शांत आणि स्मितहास्य असलेले पराग भोसले शहरातील नागरिकांना आपल्या रिक्षेतून नेहमीच ने – आण करत असतात. आपल्या हातूनही सामाजिक दायित्व घडावे, अशी त्यांची इच्छा होती.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून गुहागर शहरात गुरुवारी ४५ वर्षा वरिल दिव्यांग व्यक्तीना कोविड १९ लसीकरण करण्यात आले. यासाठी गुहागर नगरपंचायतीने आपल्या हद्दीमधील 16 दिव्यांग लोकांना रिक्षेतून घेऊन येण्याची जबाबदारी पराग भोसले यांच्याकडे सोपविली. पराग भोसले यांनी सर्व दिव्यांगाना जीवन शिक्षण शाळेमध्ये लसीकरणासाठी आणले. त्यानंतर पुन्हा घरी नेऊन सोडले. नगरपंचायतीने या प्रवासाचे पैसे भोसले यांना विचारले. मात्र त्यांनी आपणास कोणतेही शुल्क नको. ज्याप्रमाणे कोरोना संकटात आपण काम करत आहात, या आपत्तीमध्ये माझाही खारीचा वाटा असुदे असे ते म्हणाले. पराग भोसले यांच्या या सामाजिक वृत्तीचे नगरपंचायतीच्या नगरसेवक व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.