फ्रेंड सर्कल कला, क्रीडा मंडळाचे वैद्यकीय अधिक्षकांना निवेदन
गुहागर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गुहागर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास विलंब होत आहे. ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर झाल्यास रुग्णांवर तातडीने उपचार होण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु व्हावे अशी मागणी फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाने वैद्यकीय अधिक्षकांकडे केली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाने म्हटले आहे की, शहरातील एखाद्या कोरोना बाधित रुग्णास ऑक्सिजनची तत्काळ गरज भासली तर गुहागर तालुक्यातून पुढील उपचारांसाठी दुसऱ्या तालुक्यात संदर्भित केले जाते. अशा वेळी त्या रुग्णालयापर्यंत पोचण्यासाठी रुग्णासोबत नातेवाईकांची धावपळ होते. शिवाय संदर्भित रुग्णालयात पोचून उपचार सुरु होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णाचे मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयातच ऑक्सिजनसह बेडची व्यवस्था करावी. कोविड 19 या आजारावर प्राथमिक दर्जाचे उपचार याच ठिकाणी उपलब्ध व्हावेत. जेणेकरुन शहर परिसरातील गोरगरीब जनतेला तातडीने उपचार मिळतील व ते सुखरुप बरे होती. असे निवेदन सामाजिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुहागर खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाने वैद्यकीय अधिक्षकांना दिले आहे.
हे निवेदन फ्रेंड सर्कल कला, क्रीडा मंडळ गुहागरचे अध्यक्ष सागर मोरे, उपाध्यक्ष अनिकेत भोसले, प्रमुख कार्यवाहक रोहन विखारे, खजिनदार अनराज वराडकर, जयदेव मोरे, अमोल गोयथळे, योगेश गोयथळे, सुनिल पावसकर, सिध्दार्थ वराडकर, समिर पेंढारी, अमोल वराडकर, अमित भोसले, सल्लागार सुहास सुर्वे, सुधर्म आरेकर यांनी दिले आहे.