गुहागर, ता. 23 : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन ऑनलाइन भामट्याने प्राध्यापकाला फसविले.
एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250 अशी 67 हजार 250 रक्कम खात्यातून काढण्यात आली. बँकेकडे तक्रार केल्यावर रक्कम परत येईल या आशेवर हे प्राध्यापक होते. मात्र आजपर्यंत पैसे न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात आज या प्राध्यापकांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्र्वर येथे प्राध्यापक असलेले गजानन पुरुषोत्तम खापरे (मुळगाव कौलखेड, ता. जि. अकोला) यांच्या क्रेडिट कार्डवरुन भामट्याने 67 हजार 250 रुपये काढून घेतले. सदर क्रेडिट कार्ड गजानन खापरे यांनी मुंबईतील विमानतळावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विक्री स्टॉलवरुन 21 डिसेंबरला खरेदी केले होते. त्यासाठी सदर स्टॉलवर गजानन खापरे यांनी आधारकार्डची झेरॉक्स दिली होती. हे क्रेडिट कार्ड गजानन खापरेंना पोस्टाने 9 जानेवारी 2021 रोजी मिळाले. क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर अवघ्या तासाभरात खापरेंना एक फोन आला. आपण स्टेट बँक ऑफ इंडियामधुन बोलत असल्याचे सांगत सदर व्यक्तीने खापरेंना कार्ड व्हेरिफिकेशनसाठी कार्डवरील शेवटचे दोन क्रमांक व जन्मदिनांक विचारला. त्यानंतर अवघ्या 56 मिनिटांमध्ये खापरेंच्या क्रेडिट कार्डवरुन 42 हजार आणि 25 हजार 250 रुपयांचा ऑनलाइन व्यवहार झाल्याच संदेश मोबाईलवर आला. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे प्रा. गजानन खापरे यांच्या लक्षात आले. तातडीने खापरे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडीट कार्ड विभागाकडे ऑनलाईन तक्रार केली. आजपर्यंत पैसे येतील म्हणून वाट पाहिली. मात्र पैसे न आल्याने खापरेंनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.