मनिषा कन्स्ट्रक्शनचे कृत्य, प्लास्टीक कचरादेखील टाकला पाण्यात
गुहागर, ता. 23 : पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त, प्लास्टीक कचरायुक्त माती टाकण्यात आली आहे. ठेकेदाराच्या या कृत्याची माहिती मिळतान नगराध्यक्षांनी दोन डंपर अडवले. एका डंपरमधील माती परत पाठवली. टाकलेली माती परत नेण्यास सांगितले. महामार्ग प्राधिकरणचे मराठे यांना ही माहिती सांगितली. मात्र ठेकेदाराच्या मुजोर व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
सध्या मोडकाआगर धरण परिसरात भरावाचे काम सुरु आहे. तर शृंगारतळी परिसरात रस्त्याच्यासाठी खोदाईचे काम सुरु आहे. खोदकामातून काढलेली माती डंपरमध्ये भरुन ती मोडकाआगरच्या धरणात टाकली जात आहे. ही माती नाल्यातील, गटारातील असून दुर्गंधीयुक्त आहे. शिवाय प्लास्टीकच्या पिशव्या, बाटल्या, काचेच्या बाटल्या, तुटलेल्या केबल आदी कचरा या धरणात टाकला जात आहे.
काम गतीने करताना मोडकाआगरच्या धरणात आपण काय टाकतो आहोत याचा विचारही मनिषा कन्स्ट्रक्शनचे इंजिनियअर, सुपरवायझर करत नाहीत. शृंगारतळीमध्ये दोन पुल पाडण्यात आले आहेत. या पुलाखालून सांडपाणी वाहते. श्रृंगारतळीमधील कचरा ज्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, बाटल्या, खाद्य पदार्थांची वेष्टने, मटण, चिकन सेंटरमधील घाण ही याच पुलाखाली टाकली जाते. पाणी वहात होते. मनिषा कन्स्टक्शनच्या कामगारांनी पुलाच्या राडारोड्यासहीत ही दुर्गंधीयुक्त माती धरणात भरावासाठी वापरली आहे. शिवाय रस्ते रुंद करताना तोडलेल्या झाडांची मुळे, फांद्या, खोदकाम करताना तोडलेल्या केबल हा कचराही धरणाच्या पाण्यात टाकला आहे.
सदर घाण धरणाच्या पाण्यात टाकली जात असल्याचे समजता गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी तातडीने माती टाकण्याचे काम थांबवले. एक डंपर परत पाठवला. सुपरवाझरला फोन करुन ही माती उचलून नेण्यास सांगितले. मात्र नगराध्यक्षांच्या सुचनांकडे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता मराठे यांनी शासकीय उत्तर दिले. मराठे म्हणाले की, आम्ही ठेकेदाराला मोडकाआगरच्या धरणातील पाणी दुषित होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. सध्या घडलेला प्रकार नेमका काय आहे ते पाहून तशा सूचना ठेकेदाराला करण्यात येतील.