व्यक्तिगत मदतीसह भास्कर जाधवांनी दिला आधार
5.9.2020
गुहागर, ता. 5 : गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन तरुणांच्या कुटुंबियांना आमदार भास्कर जाधव यांनी वैयक्तिक आर्थिक मदत केली. शिवाय शासनाच्या योजनांमधून अधिक मदत मिळवून देण्याचे आश्र्वासनही दिले. कर्त्या तरुणांच्या जाण्याने शोकमग्न कुटुंबांच्या भेटीचे वेळी आमदारांचे डोळेही पाणावले होते.
गुहागर तालुक्यातील बोऱ्या येथे गौरी- गणपती विसर्जन करताना वैभव वसंत देवाळे आणि अनिकेत हरेश हळ्ये हे तरुण समुद्रात बुडाले. या तरुणांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आमदार भास्कर जाधव अडूर-भाटलेवाडी येथे आले होते. आमदार जाधव आल्याने गावातील मंडळीही यावेळी जमा झाली होती. दोन्ही घरांमध्ये भेटण्यासाठी ते गेले असता कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. एका महिलेने तर आमचा कर्तासवरता मुलगा गेला. आता तुम्हीच आमचे कुटुंबप्रमुख असे आमदारांना सांगितले. कुटुंबियांच्या आक्रोशाने त्यांचेही डोळे भरुन आले. त्या महिलेला धीर देताना कायम दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहीन असा शब्द भास्कर जाधव यांनी दिला. मासेमारी करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या या दोन्ही कुटुंबियांना त्यांनी वैयक्तिक आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तसेच शासनाच्या स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून तसेच मा. मुख्यमंत्री यांच्याकडून खास बाब म्हणून अधिकची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, माजी उपसभापती व पं. स. सदस्य पांडुरंग कापले, सीताराम ठोंबरे, प्रमोद हळये, एकनाथ हळये, प्रभात रांजाणे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आपण नसता तर हाल झाले असते
यावेळी गावातील अनेक मुंबईकर ग्रामस्थांनी आमदार जाधव यांची भेट घेतली. कोरोनाच्या संकटात मुंबईतून गावी येण्यासाठी आपण केलेली मदत आम्ही विसरु शकणार नाही. आपण नसता तर मुंबईत आमचे खूप हाल झाले असते. जगणे असह्य झाले असते. अशा शब्दात मुंबईकर ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.