काही माणसं आपल्या मनात कोरली जातात त्यातील एक म्हणजे मुकुंदा. आपल्या व्यवस्थापनातील कौशल्य, मैत्री, कामावरील निष्ठेमुळे, गुहागर आगारात त्याने स्वत:चे असे एक स्थान निर्माण केले होते. आज त्याच्या जाण्याने तेथे पोकळी निर्माण झाली आहे. एस.टी.सारख्या मोठ्या महामंडळात हे स्थान रिक्त रहाणार नाही. पण त्याने निर्माण केलेली प्रतिमा पुसलीही जाणार नाही.
उमेश आठवले, (गुहागर आगारातील सहकारी)
मुकुंद झगडे 1989 साली वाहक म्हणून चिपळूण आगारात सर्वसामान्य वाहकांप्रमाणे कामावर रुजु झाला. अतिशय प्रामाणिकपणे त्याने वाहकाचे कर्तव्य अनेक वर्षे पार पडले. चालकांच्या सेवेमध्ये विना अपघात सेवा करणं हे जसं कौतुकास्पद असत, तसच वाहकांमध्ये विना तक्रार सेवा करणं हे देखील कौतुकास्पद असतं. वाहक म्हणून काम करताना मुकुंदा सर्व प्रलोभनापासून दूर होता. एका पै ची अफरातफर न करता सेवा करत होता.
काही वर्षांनंतर त्याची बदली गुहागर आगारामध्ये झाली. त्याच गाव असगोली असल्याने गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांत तो सहजी मिसळून गेला. वाहकाचे कर्तव्य करत असतानाच गुहागर आगारात प्रशासकीय कामही करु लागला. उपजत व्यवस्थापन कौशल्यामुळे प्रशासकीय कामात त्यांने चुणूक दाखविली. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासनाने वाहक कर्तव्यातून थोडा मोकळेपणा देवून यांच्यावर प्रशासकीय कामाची जबाबदारी सोपवली. मुळातच हुशार असलेल्या मुकुंद झगडे गुहागर आगारातील प्रशासकीय व्यवस्थेतील सर्व विभागात काम केले. (आम्ही गंमतीने म्हणायचो, मुकुंदाने आगारातील एक टेबलही सोडले नाही.) कोणतेही काम लिलया पूर्ण करण्याच्या त्याच्या हातोटीमुळे कमी तिथे मुकुंद अशी प्रतिमा निर्माण झाली होती.
कोणत्याही आगारात सर्वाधिक वादाचे, नाराजी ओढवून घेणारे काम म्हणजे चालक वाहकांच्या ड्युटीचा तक्ता (अलोकेशन चार्ट) करणे. चालक वाहक म्हणून 100-150 पेक्षा जास्त माणसे एकत्र काम करतात तेव्हा काही माणसांची लय जमत नाही. अशी लय न जमणारी माणसे एकत्र काम करु लागली तर त्याचा त्रास सर्वांना होतो. त्यामुळे लय जमणाऱ्या चालक वाहकांच्या जोड्या जमवणे ही तारेवरची कसरत असते. प्रत्येकाशी दोस्ती असली की सर्वांना संतुष्ट करणे अशक्य असते. एकाला दुपारनंतर मोकळे होणारी ड्युटी हवी, तर दुसऱ्याला डब्याची अडचण असल्याने दुपारची ड्युटी नको. कोणाला नातेवाईकांना हॉस्पिटला घेवून जायचे असते तर कोणाला सरकारी कामासाठी मोकळा वेळ हवा असतो. कोणाला वस्ती नको असते. या सर्व अडीअडचणी लक्षात ठेवून ड्युटी लावणे म्हणजे महाकठीण काम. पण हे काम करण्याचे कौशल्य मुकुंदाकडे होते. त्याने केलेल्या अलोकेशन चार्टवरुन कधी वादविवाद झाल्याचे स्मरणात नाही.
त्याची स्मरणशक्ती इतकी अचाट होती की कोणाची आठवडा सुट्टी आज आहे. कोण रजेवर आहे. कोणाचे गाव कोणते. ड्युटी संपवून गावाला जाणारा कोण. गावावरुन कोण कामाला येतो. अशा अनेक गोष्टी त्यांच्या स्मरणात असत. स्वाभाविकपणे अनेक चालक वाहक आपल्या रजेसह अन्य विषयही मुकुंदाजवळ मोकळेपणाने बोलत असतं. रजेच्या बाबतीत वाहतुक नियंत्रक असलेल्या मुकुंदाने कधीच कोणाला अडविले नाही. काहीवेळा तर चार दिवस रजा घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला अडचणीनुरुप आठ आठ दिवसांची रजा मंजूर होत असे. गावाला गेल्यानंतर यायला उशिर झाला तर फक्त झगडे साहेबांना एक फोन करायचा. तेवढं सांभाळलं की बिनपगारी रजा पडत नसे. यामुळेच मुकुंदा अनेकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. गणपतीच्या दिवसांमध्ये झगडेसाहेब सांगतात म्हणून सलग मुंबई ड्युटी करणारे अनेक चालक गुहागर आगारात आहेत. अडल्यानडल्यावेळी झगडे साहेबांचा फोन आला की, चालक वाहक हातातील काम टाकून आगारात येत असत. त्याला फोन केला की प्रश्र्न चुटकीसरशी सुटतो असा विश्र्वास अधिकारी, सहकाऱ्यांना होता. मुकुंदाच्या शब्दाला इतका मान होता.
एक मित्र म्हणून मुकुंदाजवळ एस.टी. खेरीज अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. त्याच्याजवळ बोलताना आपल्याही ज्ञानात भर पडत असे. गुहागरच्या ज्ञानरश्मी वाचनालयातील ८० % पुस्तके मुकुंदाने वाचली होती. त्यामुळे अनेक विषयांमध्ये निर्णायक मतं द्यायला मुकुंदा कचरत नसे. त्याच मृदु बोलणं, हसत खेळत काम करणं, कधीही कोणत्याही कामाला न कंटाळणं असे अनेक विषय आज डोळ्यांसमोर तरळतायं. मुकुंदासोबत एक कटिंग चहा दोघात पिवून यावं. असं सारखं वाटतयं. पण… तो निघुन गेलाय…. कधीही परत न येण्याच्या वाटेवर. गेल्या दहा दिवसांत गुहागर आगारातील प्रत्येक टेबलावर दिसतोय….. कधी वाहकाच्या वेषात तर कधी ॲलोकेशनचा चार्ट हातात घेवून बसलेला.
माणसाच्या आयुष्याचं हे असंच असतं…
तो असतो तेव्हा समजतं नाही…
आणि नसतो तेव्हा इतका समजतो की भेटल्याशिवायं रहावतं नाही.
तुझ्या आत्म्याला सद्गति प्राप्त होवो हीच त्या जगनियंत्याला प्रार्थना.