गुहागर : विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण आहार वितरणाची नियमावली ठरवून देण्याची मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता द्यावयाच्या पोषण आहार यावर्षी प्रथमच राज्यसरकारने सुरु केलेला आहे. कंत्राटदाराच्या भल्याकरिता गणपतीपूर्वी हा पोषण आहार काही शाळांपर्यंत पोहोचविण्यात आला. काही शाळांना गणपतीच्या सुट्टीच्या काळात याचे वितरण करण्यात आले.
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गोडाऊनमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहार होता. त्या धान्य साठ्याची विल्हेवाट लावण्यात आली. परवानगी न घेता काम केल्याच्या केसेस त्या गोडावूनवर करण्यात आल्या. त्याच गोडाऊनमधून आजही धान्य पुरवठा होत आहे. मुलांकरिता मिळणारे पोषण आहाराचे धान्य किती योग्य, अयोग्य आहे. याची तपासणी होणे गरजेचे आहे.
तरी विद्यार्थी पोषण आहाराच्या धान्याचे वाटप शाळांनी कशाप्रकारे करावे याबाबत शासनाने नियमावली ठरवून द्यावी. अशी विनंती जिल्हाध्यक्ष डॉ. नातू यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. रत्नागिरी यांना निवेदनातून केली आहे.