(जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी )
मुंबई : राज्यातील पोलीस दलात शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येणार आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक रिक्त पदे भरली जावून पोलीस दलात सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. पार्श्वभूमीवर पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात मंत्रीमंडळात चर्चा झाली. 2019 या वर्षात पोलीस शिपाई संवर्गातील 5297 पदे रिक्त झाली. तर 2020 या वर्षात 6726 पदे रिक्त झाली. नव्याने स्थापन झालेल्या मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी 975 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी एकही पद भरण्यात आलेले नाही. या 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 पदे भरण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पोलीस शिपाई संवर्गातील एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यासंदर्भात मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या भरती प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने गृह विभागाला दिले आहेत.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.