गुहागरमधील साखवी ते वरचापाट परिसरात दर्शन
गुहागर, ता. 13 : शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात सध्या रात्री व पहाटे बिबटयाचे दर्शन होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा. अशी मागणी गुहागर शहरवासीयांनी केली आहे.
गुहागर शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात बिबट्याचा फिरत असल्याची चर्चा गेले आठवडाभर होती. सुरवातीला अनेकांनी या गोष्टीवर विश्र्वास ठेवला नाही. मात्र मंगळवारी रात्री 8.30 चे सुमारास साखवी ते व्याघ्राबरी मंदिर परिसरात बिबटयाला रस्त्यावर फिरताना अनेकांनी पाहिले. पुन्हा रात्री 10.30 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. वरचापाट येथील रस्त्यावरुन धावत जाणारा बिबट्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला. पहाटे मुंबईहून गुहागरला येणाऱ्या खासगी वाहनांच्या चालकांनीही वरचापाट परिसरात बिबट्या पाहिला आहे. या परिसरात दोन बछडे आणि आई असे तीनजण असल्याची चर्चा आहे. सदर बिबट्या साखवी परीसरातून समुद्र किनाऱ्यावरील नगरपंचायतीच्या कचरा प्रकल्पापर्यंत फिरतो. येथे कुत्रांचा वावर असतो. त्यामुळे हा बिबट्या कुत्र्यांच्या मागावर समुद्रापर्यंत जात असावा. अशी शंका ग्रामस्थांना येत आहे.
बिबट्याच्या भितीमुळे या परिसरातील रहदारीवरही परिणाम झाला आहे. पहाटे आणि रात्री साखवी परिसरात शतपावलीसाठी येणाऱ्या मंडळींनी आपली दिशा बदलली आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच बिबट्या या परिसरात येत असल्याने अनेक भटक्या कुत्र्यांनी बसण्याच्या जागाही बदलल्या आहेत. शहरातील गुहागरची ग्रामदेवता भैरी व्याघ्रांबरीचे मंदिरे हा भटक्या कुत्र्यांचा अड्डा होता. किमान 15-16 कुत्रे मंदिर परिसरात रात्री असतात. बिबट्याचा वावर वाढल्यावर मंदिरातील कुत्रे गायब झाले. त्यांनी उफराटा मंदिर परिसराकडे आपला मोर्चा वळवला आहे.
वस्तुस्थितीची खात्री केल्यानंतर नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी परिसरातील ग्रामस्थांना सावध रहाण्याचे, विनाकारण रात्री बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनाही राजेश बेंडल यांनी याबाबतची सूचना दिली आहे. बुधवारी सायंकाळी वन खात्याचे कर्मचारी बिबट्याचा मार्ग तपासण्यासाठी गुहागरमध्ये येण्याची शक्यता आहे.