जमीनमालकांचा आंदोलनाचा इशारा, ठेकेदाराच्या अतिक्रमणावर नाराजी
गुहागर, ता. 23 : मोडकाआगर ते गुहागर दरम्यान संयुक्त मोजणी झालेली नसताही महामार्गाचे ठेकेदार आणि कामगार वैयक्तिक मालकीच्या जागांमधील वृक्षतोड करत आहेत. हे ठेकेदाराचे अतिक्रमण आहे. याबाबत ठेकेदाराने योग्य तो खुलासा करावा. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा जमीनमालकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे यांना देण्यात आले.
संयुक्त मोजणीच्या आधीच रस्त्याचे काम करणारा ठेकेदार परवानगीशिवाय वृक्षतोड आणि उत्खनन करत आहे. असा आक्षेप गुहागर, पाटपन्हाळे, मोडकाआगर परिसरातील 52 जमीनमालकांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार सौ. लता धोत्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याचे काम करणारा ठेकेदार महामार्गाकरीता भूसंपादन झाल्याचे सांगतो. मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांच्या कार्यालयात माहिती घेतली असता गुहागर चिपळूण रस्त्यांची रुंदी 7 मीटर आहे. हा मार्ग 2018 मध्ये सार्वजनिक बांधकामने राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, चिपळूणचे अधिकारीही 30 मीटर रुंदीचा रस्ता यापूर्वीच संपादितकेल्याचे सांगतात. मात्र भूसंपादनाची कागदपत्रे मागितली असता कोणतीही कागदपत्रे आम्हाला देण्यात आलेली नाही. यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, चिपळूण उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी तसेच भूमीअमिलेख कार्यालय यांच्याकडे वारंवार लेखी अर्ज देवून, पाठपुरावा करुनही आजपर्यंत संयुक्त मोजणीची प्रक्रिया करण्यात आलेली नाही.
महामार्गाच्या कामात अडथळा आणण्याचा आमचा हेतू नाही. परंतु आमच्या वैयक्तिक मालकीच्या मिळकतींचे नुकसान सध्या कोणताही हक्कसंबंध नसताना मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. संयुक्त मोजणी न झाल्याने आमच्या मालकीची किती जागा भुसंपादीत केली जाणार याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. भूसंपादन कायद्याप्रमाणे आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करुन, जमीन मालकांना मोबदला देवून नंतर महामार्गाचे काम सुरु होणे योग्य ठरेल. त्यामुळे 31 जानेवारी 2021 पूर्वी भुसंपादन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, भूमि अभिलेख, सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे, महसुल, मनिषा कन्स्ट्रक्शनचे अधिकारी या सर्वांसह संयुक्त बैठक आयोजित करावी. तोपर्यंत महामार्गाचे कामकाज आमच्या मालकीच्या मिळकतींमध्ये करण्यात येवू नये. सहकार्य न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्विकारावा लागेल.
गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे यांना हे निवेदन देताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, काँग्रेस आयचे प्रदिप बेंडल, यांच्यासह जमीनमालक उपस्थित होते.