गुहागर : मातीची भांडी बनविण्याचा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. असे पर्यावरण पुरक आणि प्रदुषण विरहीत प्रकल्प कोकणातील पर्यटन समृध्द करतील. शिवाय त्यातून उत्पन्न होणाऱ्या रोजगारामुळे कोकणचा आर्थिक विकासही होईल. असे मत राज्यमंत्री आदिती तटकरे (उद्योग व खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क आणि विधी व न्याय राज्यमंत्री) यांनी व्यक्त केले. धोपावे येथील भुमि पॉटरी अँड क्ले स्टेशनला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी कु. तटकरे यांनी मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद अनुभवला.
गुहागर तालुक्यातील धोपावे गावात राजन दळी यांचा कृपा औषधालय हा कृपा हेअर टॉनिक निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्याचा उत्पादन विभाग सांभाळतानाच सौ. रसिका दळींनी बनवलेल्या फोल्डींगच्या गुढीला देशविदेशातून मागणी आली. त्यानंतर त्यांनी रंगबिरंगी पणत्यांसोबत आयुर्वेदिक उटणे, साबण असे दिवाळीच्या सणात भेट देण्याचे पॅकेट तयार केले. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच पुढे मातीची भांडी बनविण्याच्या उद्योगाला सौ. रसिका दळींनी सुरवात केली. खादी ग्रामोद्योगने या कुटीर उद्योगाला केवळ आर्थिक मदत केली नाही, तर उत्पादीत मातीच्या भांड्याना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. वेगळा उद्योग लोकांपर्यंत पोचावा. यासाठी खादी ग्रामोद्योगच्या वेब पोर्टलवर भुमि पोर्टरी ॲण्ड क्ले स्टेशनचा व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ राज्यमंत्री आदिती तटकरेंनी पाहिला. तेव्हापासून धोपाव्यातील या उद्योगाला भेट देण्याचा विचार राज्यमंत्री आदिती तटकरे करत होत्या.
त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा दौर्यावर आलेल्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आज (रविवार, 8 नोव्हेंबर) वेळात वेळ काढून या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी रसिका दळी यांनी मातीच्या कुंडीत लावलेले वृक्षाचे रोप देऊन स्वागत केले. प्रकल्पाची पहाणी करताना सौ. दळी यांनी प्रकल्पासाठी लागणारी माती, त्यावर करावी लागणारी प्रक्रिया, भांडी तयार करण्याचे साचे, तयार भांडी पक्की करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया या सर्वाची माहिती दिली.
कु. आदिती तटकरे प्रकल्पाची पाहणी करताना बारकाईने काम करणाऱ्या महिलांकडून प्रत्येक गोष्टी जाणून घेत होत्या. तसेच मातीची भांडी बनवणार्या एका मशीनवर चक्क स्वतः हातात माती घेऊन भांडी तयार करण्याचा अनुभव घेतला. या प्रकल्पात तयार केले जाणारे दही पॉट, कपबशी, ग्लास, पाण्याची बॉटल, कॉपी मग, तांब्याचा पेला, वॉलपीस, पेन स्टॅन्ड यासारख्या सुमारे ६० वस्तू त्यांनी पाहिल्या.
धोपावे सारख्या खेडेगावात स्थानिक महिलांना सोबत घेवून उभ्या केलेल्या प्रकल्पामुळे कु. आदिती तटकरे भारावून गेल्या होत्या. त्यांनी सौ. रसिका दळी यांचे मन:पूर्वक आभार मानले. तसेच भविष्यात या प्रकल्पासाठी कोणतेही सहकार्य लागल्यास उद्योग खाते नक्कीच मदत करेल. अशी ग्वाही कु. तटकरे यांनी सौ. दळींना दिली.
यावेळी उद्योजक राजन दळी, डॉ. वैभव दळी, डॉ. सौ. प्रिती दळी, चंदन दळी तसेच कृपा औषधालय व भुमि पोटॅरीचे अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, तहसीलदार लता धोत्रे, अजय बिरवटकर, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अधिकारी, राजा आरेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, नगरपंचायत गटनेता उमेश भोसले, भाजप शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, धोपावे सरपंच सदानंद पवार आदी उपस्थित होते.