गुहागर : हिवाळा सुरु झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरवात होते. मात्र यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमी दाबाच्या पट्टे यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही किनारपट्टीवर कासवे अंडी घालण्यासाठी आलेली नाहीत.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास, दापोली तालुक्यातील आंजर्ले, कोळथरे, केळशी, कद्रे, लाडघर, पाडले, मुरुड, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर आणि तवसाळ, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी आणि राजापूर तालुक्यातील माडबन व वाडावेत्ये या 14 गावातील समुद्रकिनाऱ्यांवर वन विभागामार्फत ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहिम राबवली जाते. 2019-2020 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर 652 घरट्यातील 65853 अंडी वन विभागाने संरक्षित केली होती. त्यापैकी 32433 अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात वनविभागाला यश आले.
यावर्षीही वनविभागाने जिह्यात कासव संवर्धन मोहिमेची तयारी नोव्हेंबर महिन्यापासून सुरु केली. परंतू डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील 14 किनाऱ्यांपैकी एकाही किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवीण अंडी घालण्यासाठी आलेली नाही. त्यामुळे वनखात्याने नेमलेले कासवमित्र, वनखात्याचे अधिकारी देखील चिंतेत आहेत.
याबाबत बोलताना ऑलिव्ह रिडले जीवनचक्र अभ्यासक माधव मुधोळ म्हणाले की, मुळात गेल्या तीन चार वर्षांचा अभ्यास केला तर अंडी देण्याचा कालावधी पुढे सरकत असल्याचे लक्षात येईल. याचे सामान्य कारण ग्लोबल वॉर्मिंग हे आहे. यावर्षी कोकण किनारपट्टीला निसर्ग वादळाचा चांगलाच फटका बसला आहे. जमीनीवरील नुकसान आपल्याला दिसले. पण समुद्र देखील चक्रीवादळामुळे ढवळून निघाला. त्यानंतरही पश्चिम उत्तर समुद्रात दोन वेळा चक्रीवादळे झाली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडी उशीरा पडली. डिसेंबर महिन्यात पाऊस पडला. या सर्वाचा परिणाम कासवांच्या जीवनचक्रावरही झाला आहे. ती इतस्तत: विखुरली गेल्याने त्यांच्या मिलनाचा काळ लांबला. स्वाभाविकरित्या अंडी घालण्याचा काळ लांबला आहे. यावर्षी जानेवारीपासून विणीच्या हंगामाला सुरवात होईल असा अंदाज आहे.
हरिहरेश्र्वरच्या किनाऱ्यावर सापडली अंडी
नाताळच्या दिवशी (ता. 25) रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहेश्र्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाचे घरटे वन विभागाला सापडले आहे. या घरट्यातून 138 अंडी संरक्षित करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर या हंगामात सापडलेले हे पहिले घरटे आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून कोकण किनारपट्टीवर विणीचा हंगाम सुरु होईल असा अंदाज आहे.