सुशील कुलकर्णी; पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाला रत्नागिरीत थाटात सुरुवात
रत्नागिरी, ता. 08 : हिंदू धर्म हाच खरा राष्ट्रधर्म आहे. तो राष्ट्राशी प्रामाणिक राहायला, राष्ट्र उभे करायला शिकवतो. कीर्तनसंध्या महोत्सवातून होत असलेल्या जागरामध्ये तरुण पिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग कौतुकास्पद आहे. हिंदू धर्मावरचे प्रेम, निष्ठा, योगदान आणि हिंदुत्वाचे हे स्फुल्लिंग असेच पेटते ठेवावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध यू-ट्यूबर, पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी रत्नागिरीत केले. Kirtansandhya Festival
पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाचा प्रारंभ 06 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी झाला. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून या महोत्सवात कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना त्यांनी कीर्तनातून धर्मजागृतीची गरज अधोरेखित केली आणि या महोत्सवात तरुणाईच्या असलेल्या मोठ्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या रसाळ, सुश्राव्य वाणीतून ‘महाभारत (उत्तरार्ध)’ हा विषय उलगडायला सुरुवात झाली आहे. Kirtansandhya Festival

आफळेबुवांसह पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, देसाई उद्योगसमूहाचे जयंतराव देसाई, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक श्री. पाटील, कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून, तसेच श्री गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रपठणानंतर भारावलेल्या वातावरणात कीर्तनाला सुरुवात झाली. यावेळी गेल्या वर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवातील आख्यानाचा थोडक्यात आढावा घेण्यात आला. कौरवांनी जिंकलेल्या पांडवांच्या खांडववनाची, बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केल्यानंतर हस्तिनापुरासह सर्व राज्य पांडवांकडे सुपूर्द करण्याची धृतराष्ट्राची कबुली, तेरा वर्षांनंतरही हे राज्य पांडवांना देण्यास दुर्योधनाला पुढे करून धृतराष्ट्राने केलेले टाळाटाळ आणि त्यासाठी सुरू केलेली कृष्णशिष्टाई असे विषय बुवांनी मांडले. Kirtansandhya Festival

पूर्वरंगानंतर कार्यक्रमाच्या मध्यांतरात पितांबरी उद्योगसमूहाचे रवींद्र प्रभुदेसाई यांचा आफळेबुवांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पहिल्या वर्षीपासून ते कीर्तनसंध्याचे आधारस्तंभ असून, त्यांच्या योगदानानिमित्त त्यांना योगेश्वर श्रीकृष्णाची भव्य प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आफळेबुवा, श्री. प्रभुदेसाई, श्री. कुलकर्णी, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते कोकण मीडियाच्या कीर्तनसंध्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकात कीर्तनसंध्याच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला असून, महाभारतावरील १८ भागांची धनंजय चितळे यांची लेखमालाही एकत्रितरीत्या प्रकाशित करण्यात आली आहे. Kirtansandhya Festival

माकड-वानरांना पळवून लावण्यासाठी पितांबरी कंपनीने विकसित केलेल्या पितांबरी वन्यप्राणिरोधक अर्थात मंकी अँड वाइल्ड अॅनिमल रिपेलंट या औषधाचे उद्घाटनही या महोत्सवात करण्यात आले. त्या औषधाबद्दल माहिती सांगताना श्री. प्रभुदेसाई म्हणाले, पितांबरी कायमच ग्राहकांना देव मानते. आंब्याचा हंगाम जवळ येतोय. त्या वेळी शेतकऱ्यांना होणारा वानर-माकडांसह अन्य वन्यप्राण्यांचा त्रास कमी व्हावा, म्हणून वन्यप्राणिरोधक औषध पितांबरीने विकसित केले आहे. ससे, हरीण, नीलगाय, हत्ती असे वन्यप्राणीही यामुळे दूर राहू शकतात. तळवड्याला आमच्या बागेत माकडांनी कलिंगडे, केळ्यांची नासधूस केली. त्यानंतर हे औषध विकसित करण्याची कल्पना सुचली. लेमनग्रास, सिट्रोनेला, लसूण, गोमूत्र अर्क अशा अनेक तीव्र वासाच्या घटकांचा वापर करून हे औषध तयार करण्यात आले आहे. ते बिनविषारी आहे. एक लिटर औषध वीस लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास आठ-१० दिवस वन्यप्राणी फिरकत नाहीत, असा अनुभव आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असून, औषधाच्या आवश्यक त्या चाचण्या घेतलेल्या आहेत. Kirtansandhya Festival

सुशील कुलकर्णी म्हणाले, माणसातील माकडे, हिंदुत्वाला उपद्रव करणारी माकडे घालवणारे औषध आफळेबुवा कीर्तनाच्या माध्यमातून देत आहेत. आपला सनातन हिंदू धर्म डौलाने, अभिमानाने पुढे जात राहो. कीर्तनसंध्या २०२६ या महोत्सवात नामवंत कलाकारांची प्रभावी साथसंगत लाभत असून त्यामध्ये तबला – केदार लिंगायत, पखवाज – मंगेश चव्हाण, ऑर्गन – चैतन्य पटवर्धन, व्हायोलिन – उदय गोखले, तालवाद्य – हरेश केळकर, बासरी – मंदार जोशी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर करत आहेत. Kirtansandhya Festival
कीर्तन महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून देणगी सन्मानिका कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतील. इतिहास, भक्ती, विचार आणि संस्कार यांचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अवधूत जोशी (९०११६६२२२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे. Kirtansandhya Festival
