उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचा घेतला आढावा.
(जिल्हा माहिती कार्यालयाच्या सौजन्याने)
रत्नागिरी : कोविड केअर सेंटरमधील वातावरण सकारात्मक असेल तर रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील. त्यातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. जिल्ह्यात रुग्ण वाढ का होत आहे याचा अभ्यास करावा. तपासणीचे प्रमाण वाढले तर उपचार गतीने होतील. मृत्युदर नियंत्रणात येईल. अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या. ते जिल्ह्याच्या आढावा बैठकीत बोलत होते.
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सभा झाली. या बैठकीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. ते म्हणाले की, सध्या जिल्ह्यात वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. या रुग्णवाढीची कारणे शोधली तर साथ आटोक्यात येण्यास मदत होईल. तपासणीचे प्रमाण वाढवेल तर कोरोनाचे निदान लवकर होईल. गतीने उपचार करणे सोपे जाईल. पर्यायाने साथ आटोक्यात येण्यास मदत होईल. मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल.
कोविड केअर सेंटरमध्ये प्रसन्न वातावरण ठेवा
बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढविण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये प्रसन्न वातावरण ठेवणे आवश्यक आहे. रुग्णाला घरी असल्याप्रमाणे सुविधा येथे देण्याची सुरुवात करा. रुग्णांच्या मनोरंजनासाठी टिव्हीची व्यवस्था करावी. रुग्णांना गाणी ऐकण्यासाठी हेडफोन सारख्या सुविधा द्या. यामुळे रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील. रुग्णालयातील वातावरण आपण निश्चित बरे होणार आहोत याचा विश्र्वास देणारे असेल तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल.
रुग्णांच्या आकडेवारीचा आढावा घ्या
अनेक कोरोनाग्रस्त गृह विलगीकरणात आहेत. काही रुग्ण उपचारासाठी इतर जिल्ह्यात गेले आहेत. यापैकी किती रुग्ण बरे झाले याचा एकदा आढावा घ्या. जेणेकरुन योग्य आकडेवारी समोर येईल. याबाबतची कारवाई तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मृत व्यक्ती कोरोनाग्रस्त होता का याची खात्री करा
सध्या रुग्णालयात उपचार घेताना मृत्यु झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार कोविड रुग्णाच्या अंत्यसंस्कारांप्रमाणे केले जातात. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या मृत्यूनंतर अँटीजेन चाचणी करुन तो रुग्ण खरोखरच कोरोनाग्रस्त होता का याची खात्री केली पाहिजे. सदर मृत कोरोनाग्रस्त नसेल तर त्याची माहिती पारदर्शकपणे नातेवाईकांना द्या. असे निर्देश सामंत यांनी बैठकीत दिले.
या आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाकर, पोलीस उपअधिक्षक विशाल गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, डॉ. अनिल बोल्डे तसेच नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, सभापती बाबू म्हाप आदी लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.