गुहागर, ता. ६ : गेले दोन महिने इंडियन टेलिव्हिजनचे सीईओ अनिल वनवारी दररोज दोन तास गुहागरच्या समुद्रकिनार्याची स्वच्छता करत आहेत. या कामाची दखल गुहागरमधील पत्रकारांनी घेतली. पत्रकार दिनाचे निमित्ताने गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे अनिल वनवारी यांचा सत्कार करण्यात आला. 57 वर्षीय वनवारी यांनी रक्तदान करून पत्रकार संघाला शुभेच्छा दिल्या.
गुहागर शहरातील मँगो व्हिलेजमध्ये घर असलेले अनिल वनवारी इंडियन टेलिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 1988 मध्ये वनस्पती शास्त्रातून विज्ञान शाखेची पदवी घेतलेल्या वनवारी यांनी झेवियर इन्स्टिटयूट मधून वृत्तपत्रकारीता आणि मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर बिझनेस वर्ल्ड या मासिकामध्ये उपसंपादक आणि सहाय्यक संपादक म्हणून काम केले. फायनान्सीयल एक्सप्रेस, बिझनेस स्टॅण्डर्ड मध्ये स्तंभलेखनही ते करत. टेलिव्हीजन बिझनेस इंटरनॅशनल, सॅटेलाईट युरोप, केबल अॅण्ड सॅटेलाईट एशिया अशा विविध माध्यम क्षेत्रांतील नामांकित कंपन्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून अनिल वनवारी यांनी काम केले आहे. 1999 मध्ये इंडियन टेलिव्हीजन ही कंपनी त्यांनी सुरू केली. मिडिया, अॅडव्हर्टायझिंग, मार्केटींग, केबल आणि सॅटेलाईट टीव्ही प्रोफशनल्स, पत्रकारिता, अशा क्षेत्रामध्ये ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते.
दिवाळीनंतर मुंबईतील शहरी जीवनात बदल म्हणून अनिल वनवारी गुहागरमध्ये रहाण्यासाठी आले. येथे दररोज समुद्रावर जाताना आजूबाजूला पडलेला कचरा त्यांना अस्वस्थ करत असे. स्वच्छतेची सुरूवात आपल्यापासूनच करावी म्हणून त्यांनी दररोज सकाळी आणि सायंकाळी एक तास समुद्र किनार्याच्या स्वच्छतेचा ध्यास घेतला. गेले दोन ते अडीच महिने स्वच्छतेचे काम ते करत आहेत. यासाठी आवश्यक हॅण्डग्लोज, फावडे, टोपली, गोणी आदी साहित्य त्यांनी खरेदी केले. त्यांच्या दररोजच्या कामातून आज संपूर्ण किनारा स्वच्छ झाला आहे. या कामाची दखल घेत गुहागर तालुका पत्रकार संघाने पत्रकार दिनाच्या दिवशी अनिल वनवारी यांचा सत्कार केला.
या सत्कारला उत्तर देताना वनवारी म्हणाले की, स्वच्छतेची सुरवात आपल्यापासून झाली पाहिजे. भाषणे करून स्वच्छता होणार नाही. म्हणून मी स्वत: कचरा उचलण्यास सुरवात केली. रोज थोडावेळ सातत्याने काम केल्याने आपला मुळातच सुंदर असलेला समुद्रकिनारा अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. आपण सर्वांनी देखील निसर्गाने देणगी दिलेला हा समुद्रकिनारा रोज थोडा वेळ देऊन स्वच्छ केला पाहिजे.
कोरोनाच्या संकटानंतर देशाची गरज ओळखून गुहागर तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आहे. गुहागर सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावाचा ग्रामस्थ होण्याचा मला आनंद होतोय. असे मत इंडियन टेलिव्हीजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वनवारी यांनी व्यक्त केले.