ग्राहकांची महावितरणवर धडक; सुरक्षेसाठी पोलिस धावले
30.08.2020
गुहागर : सर्वसामान्य जनता कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेली असतानाच महावितरण कंपनीने भरमसाठ वीज बिले माथी मारल्याने तालुक्यातील सुमारे साडेतीनशे संतप्त ग्राहकांनी सोमवारी शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. वाढीव बीलांमुळे संतप्त असलेल्या ग्राहकांनी येथील अधिकार्यांना धारेवर धरल्याने अखेर जमावाला शांत करण्यासाठी अधिकार्यांना पोलिसांना बोलवावे लागले. महावितरण कंपनीने जून-जुलै महिन्यामध्ये मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांची वीज बीले सरासरी पध्दतीने काढून ती ग्राहकांना वितरीत केली आहेत. मुळात या महिन्यात झालेला प्रत्यक्ष वीज वापर आणि आलेले वीज बील यामध्ये मोठी तफावत असून वाढीव वीज बीले ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याचे यावेळी संतप्त वीज ग्राहकाने सांगितले. वाढीव वीज बीलांबाबत सोमवारी तालुक्यातील संतप्त ग्राहकांनी सकाळी 10 वा. पासून शहरातील वीज महावितरण कार्यालयासमोर गर्दी केली होती. कोरोना संकटामुळे आम्हाला कामधंदे नाहीत. अशावेळी वीज वापरापेक्षा अधिकचे बील भरणे कठीण झाले आहे. महावितरण कंपनीने दर महिन्याला बीले दिली असती तर आम्ही ती भरली असती, असे ग्राहकांनी सांगितले. काही ग्राहकांनी येथील अधिकार्यांनाच घेराव घालून जाब विचारल्याने पोलिसांना बोलवावे लागले. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतत्प ग्राहकांना शांत करून भरमसाठ बीले कमी करून घेण्यासाठी ग्राहकांना रांग लावण्यास सांगण्यात आले.