गुहागर, ता. 02 :
तालुक्यातील हेदवीच्या समुद्रकिनारी बामणघळीचे सौंदर्य पहाण्यासाठी ठाण्यातून पर्यटक आले होते. त्याच्यापैकी सौ. सुचिता माणगावकर (वय 33) हिचा सेल्फी घेताना तोल गेला. तिला पकडण्यासाठी पती आनंद माणगावकर (वय 36) धावले. मात्र दोघेही धोकादायक घळीत पडले. घटनेनंतर 45 मिनिटांत हेदवीतील ग्रामस्थ तेथे पोचले. स्थानिक तरुणांनी खडपात जावून दोघांनी पाण्याबाहेर खेचले. पण दुर्दैवाने तो पर्यंत पतीपत्नीचा मृत्यु झाला होता. हेदवीतील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 11 वा. ठाण्यातील चार पर्यटक अनंत माणगावकर, सौ. सुचिता माणगावकर, आनंद माणगावकर यांची आई आणि मामेभाऊ असे स्वतंत्र वाहनाने हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावर पोचले. चालकासह हे चौघेजण बामणघळ पहाण्यासाठी गेले. चालक आणि आनंद माणगावकर यांची आई डोंगरात थांबली. तर मामेभाऊ, आनंद माणगावकर आणि त्यांची पत्नी सुचिता माणगावकर हे तिघे घळीच्या किनाऱ्यावरील दगडात उभे राहून समुद्राचे घुसळत आत शिरणारे आणि कारंज्यासारखे उडणारे पाणी दगडावर बसून पहात होते. यावेळी सुचिता माणगावकरला पतीसह सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. समुद्राचे घुसळत वेगाने घळीत शिरणारे पाणी देखील सेल्फीसोबत टिपण्याचा प्रयत्न सुचिता करत होती. त्याचवेळी समुद्राची एक लाट ते बसलेल्या खडकावर येवून आपटली. अचानक आलेल्या लाटेने सुचिताचा तोल गेला. पत्नी पडते आहे हे लक्षात आल्यावर आनंद माणगावकर यांनी सुचेताला पकडण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने दोघेही घळीत पडले. भरतीची वेळ असल्याने वेगाने घुसळणाऱ्या पाण्यातून बाहेर पडणे या दोघांना शक्यच नव्हते. शिवाय लाटांच्या घुसळणीत ती दोघं घळीतील दगडांवरही आपटले असावेत.
चालकाने दुरुनच ही घटना पाहिली आणि त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात असलेले स्थानिक तरुण धावत घळीपर्यंत पोचले. दोघेही घळीत दिसत नाहीत म्हटल्यावर स्थानिक तरुण आपला जीव धोक्यात टाकून समुद्राचे पाणी घळीत शिरते त्याठिकाणी खडपात पोचले. जाड दोरखंड आणि गळ मागविण्यात आला. सुमारे अर्ध्या तासांनी घळीच्या मुखातून पतीपत्नी समुद्रात वाहत असताना दिसली. अक्षरश: एखादा मासा पकडावे त्याप्रमाणे गळ टाकून स्थानिकांनी दोघांना खडकातून पाण्याबाहेर काढले. परंतू दुर्दैवाने दोघांचाही मृत्यु झाला होता. ही घटना सुमारे 11.30 च्या सुमारास घडली.
दरम्यानच्या काळात हेदवीचे सरपंच गजानन हेदवकर, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील रवींद्र मोहित, ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य हे देखील बामणघळ परिसरात पोचले. पोलीस पाटील रवींद्र मोहितेंनी 12.45 च्या सुमारास गुहागर पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली आहे. बचाव कार्यात सुहास भाटकर, अंगद भाटकर, गजानन पवार, अमेय हळदणकर, दिपक भाटकर, मिलिंद पाटेकर, अभिजीत राऊत आदींचा सहभाग होता. रत्नागिरीत गेलेल्या तारेश हळणदणकरने त्याला माहिती समजताच गावात पोलीस पाटील, सरपंच यांना फोन करुन दुर्दैवी अपघाताची माहिती दिली. अन्य काही मित्रांना समुद्रावर मदतीसाठी पाठवले.