जिल्हाधिकार्यांचे आदेश; सोमवारपासून महसुल आणि कृषी करणार पंचनामे, ग्रामसेवकांचाही सहभाग
गुहागर : पावसाळा संपतानाच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. परतीच्या पावसाने या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका कापणीला आलेल्या हळव्या व मध्यम भातपिकाला बसला आहे. भातशेती आडवी झाली. अडव्या आणि कापलेले भात वाहून गेले. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. जिल्हाधिकार्यांनी सोमवार पासून (ता. 19 ऑक्टोबर) नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषि विभागाला दिले आहेत.
परतीच्या पावसाने हळव्या व मध्यम भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी कापलेले भातपिक शेतातच भिजले असून त्याला आता कोंब येऊ लागले आहेत. तर काही ठिकाणी शेतखळ्यावर आणलेले भात पुर्णपणे भिजून गेले आहे. काहीजणांच्या अडव्या पुरात वाहून गेल्या आहेत. आजही अनेक शेतदळात पाणी असल्याने पाऊस गेला तरी चिखलात कापणी कशी करायची असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.
राज्य सरकारने परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने तयार करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार, 19 ऑक्टोबरपासून महसुल, कृषी विभागाला संयुक्तपणे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये तलाठी, कृषि सहाय्यक यांच्यामार्फत शेतावर जावून तत्काळ पहाणी करण्यात यावी. पिकांचे नुकसानीबाबत संयुक्त पहाणी करून नुकसानीच्या पंचयाद्या कराव्यात. ग्रामसेवक यांनी संबंधित शेतकरी तोच असल्याची खात्री करावी व संबंधित कृषि सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक यांनी पिकांच्या नुकसानीची टक्केवारी निश्चित करावी. असे या आदेशात म्हटले आहे.
कोरोना महामारीच्या संकटात लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेले चाकरमानी एप्रिल मे पासून गावीच राहू लागले होते. त्यामुळे शेतीच्या कामाला प्रारंभीच्या काळात स्थानिक ग्रामस्थांना मोठी मदत झाली. अनेक ओस पडलेल्या जागांवरही यावर्षी भात पेरेले गेले. जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊसही समाधानकारक झाला. यावेळी शेतात सोने पिकणार म्हणून कोकणातील शेतकरी आनंदात होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी पेरले. गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसाने भातशेतीला फटका बसला होता. यावेळी अखेरच्या क्षणी अतिवृष्टीने दगा दिला.

