अरुण परचुरे; श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानच्या ट्रस्टींनी केले प्रकाशन
गुहागर न्यूजने यावर्षी प्रथमच दिनदर्शिका (Guhagar News Calendar 2022) प्रकाशित केली. या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुहागरचे ग्रामदैवत श्री भैरी व्याघ्रांबरी मंदिरात ट्रस्टींच्या हस्ते करण्यात आले. गुहागरमधील उत्सव आणि लोककलांचे फोटो दिनदर्शिकेत प्रसिध्द करुन सांस्कृतिक गुहागरचा स्पर्श या दिनदर्शिकेला देण्यात आला आहे. ही कौतुकाची बाबत असल्याचे मत यावेळी ट्रस्टी अरुण परचुरे यांनी व्यक्त केले.
गुहागर न्यूजचे मनोज बावधनकर, मयूरेश पाटणकर आणि गणेश धनावडे यांनी मंगळवारी (ता. 18) भैरी व्याघ्रांबरीचे पूजन करुन दिनदर्शिका (Guhagar News Calendar 2022) ग्रामदैवतेला समर्पित केल्या. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष शरद शेटे, उपाध्यक्ष मुरलीधर बागकर, पंच अशोक जांगळी, गजानन जांगळी, अरुण परचुरे, प्रभुनाथ देवळेकर, दिपक शिरधनकर, कल्पेश जांगळी, नगरसेवक समिर घाणेकर, तसेच प्रतिथयश विमा उद्योजक संतोष वरंडे यांच्या हस्ते गुहागर न्यूजच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मयूरेश पाटणकर यांनी उपस्थित मान्यवरांना या दिनदर्शिकेचे वेगळेपण समजून सांगितले. देवस्थानच्या वतीने मनोज बावधनकर, मयूरेश पाटणकर आणि गणेश धनावडे यांना देवीचा प्रसाद म्हणून श्रीफळ आणि गुलाबपुष्प शरद शेटे, मुरलीधर बागकर आणि अरुण परचुरे यांनी दिले.
त्यानंतर देवस्थान ट्रस्टींच्या वतीने बोलताना अरुण परचुरेसर म्हणाले की, अत्यंत कमी वेळेत दिनदर्शिका बनविताना (Guhagar News Calendar 2022) त्यात गुहागरमधील पर्यटनस्थळे, लोककला यांचे फोटो प्रसिध्द केले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये न्यूज पोर्टल होती. गुहागरमध्ये असलेली उणिव माझ्या तिन्ही विद्यार्थ्यांनी भरुन काढली. श्री भैरी व्याघ्रांबरीचे आशिर्वाद घेवून सुरु झालेल्या गुहागर न्यूजने अल्पावधीत यश मिळवले आहे. त्यांच्या या कामाला आमच्या शुभेच्छा आहेत.
देवस्थानचे पंच आणि गुहागर नगरपंचायतीचे नगरसेवक समीर घाणेकर आभार मानताना म्हणाले की, गुहागर न्यूजसारख्या जगभरात पोचलेल्या वेब पोर्टलच्या संचालकांनी दिनदर्शिका प्रकाशनचा (Guhagar News Calendar 2022) मान ग्रामदेवतेच्या पंच मंडळाला दिला. यातून त्यांचे देवस्थानवरील आणि गुहागरवरील प्रेम लक्षात येते. त्यांच्या वेब पोर्टलची उत्तरोत्तर भरभराट होवो ही भैरी व्याघ्रांबरी चरणी प्रार्थना.
गुहागर न्यूजचे संचालक मनोज बावधनकर यांनी उपस्थितांना तिळगुळ दिला. मंगळवारी (ता. 18) सकाळी दिनदर्शिका ताब्यात आल्यानंतर केवळ तीन तासांच्या अवधीमध्ये निरोप देवून सर्व मान्यवर उपस्थित राहीले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्याचप्रमाणे गुहागर न्यूजच्या दिनदर्शिकेमध्ये जाहिरात देवून सहभागी झालेले सर्व जाहिरातदार, हितचिंतक, दिनदर्शिकेमधील डिझाईनचे काम करणारे जानकी आर्टस्चे प्रथमेश घरट, तयार झालेल्या दिनदर्शिका गुहागरपर्यंत अल्पमुल्यात आणणारे सुंकाई ट्रॅव्हल्स् व निनाद बिर्जे या सर्वांना मनोज बावधनकर यांनी धन्यवाद दिले.
गुहागर न्यूजची 2022 ची पंचागासहितची दिनदर्शिका (Guhagar News Calendar 2022) पीडीएफ स्वरुपात खाली देत आहोत. गुहागर न्यूजच्या सर्व वाचकांना विनंती आहे की ही दिनदर्शिका आपण आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करुन घ्यावी.