शहरप्रमुख नीलेश मोरे, पेट्रोलपंपासाठी सह्यांची मोहिम उघडणार
गुहागर ता. 22 : कोरोनाच्या संकटातही तालुका प्रशासनाला एकाच रुग्णवाहिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे कोरोनारुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अन्य रुग्णवाहिकेची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या आमदार निधीतून गुहागर तालुक्यासाठी रुग्णवाहिका दिली आहे. पुढील आठवडाभरात त्याचा लोकार्पण सोहळा होईल. अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी दिली.
नीलेश मोरे म्हणाले की, आज गुहागर तालुक्यात 108 रुग्णवाहिका कोविडसाठी कार्यरत आहे. मात्र या रुग्णवाहिकेवर आरोग्य अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. लोकांनी फोन करुनही रुग्णवाहिका वेळेवर येत नाही. संपूर्ण तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका अपुरी पडत आहे. मार्च महिन्यापासून रुग्णवाहिकेची मागणी तालुका प्रशासन करत आहे. मात्र सहा महिने उलटून गेले तरी रुग्णवाहिका मिळालेली नाही. या विषयात आमदार जाधव यांनी लक्ष घातले. आमदार निधीतून निधी दिला. रुग्णवाहिका खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आठवडाभरात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा होईल.
नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती दिपक कनगुटकर म्हणाले की, मोडकाआगर पुल आणि शृंगारतळी रस्त्याबाबतही यावेळी चर्चा झाली. मोडकाआगर पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे. आणि शृंगारतळीपासून मोडकाआगर पुलाला जोडणारा रस्ता प्राधान्याने पूर्ण व्हावा. त्यानंतरच गुहागर मोडकाआगर रस्त्याच्या कामाला ठेकेदाराने सुरवात करावी. अशी मागणी आमदार जाधव यांच्याकडे आम्ही केली आहे.
पेट्रोलपंपाबाबतही आमदार भास्कर जाधव यांच्याकडे चर्चा केली. मात्र सी व्ह्यु गॅलरी आणि जेटीच्या कामाला गुहागरकरांनीच विरोध केला. तेव्हा पेट्रोलपंपाची ही अशीच गत होवू शकते. त्यामुळे गुहागरकरांना खरच पेट्रोलपंप हवाय का ते विचारुन घ्या. शहरवासीयांची मागणी असेल तरच आपण पुढे जाऊया. अशा प्रकारचे आम. जाधवांनी आम्हाला सुनावले. असे ही यावेळी नीलेश मोरे व दीपक कनगुटकर यांनी सांगितले.
परंतु गुहागरसाठी पेट्रोलपंप आवश्यक आहे. तालुक्यात अन्यत्र पेट्रोलपंप झाले. मात्र गुहागर शहरात पेट्रोलपंप झालेला नाही. ही उणीव दुर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव फार पुर्वीपासून प्रयत्न करत होते. परिवहन मंत्री, एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांच्याकडेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. त्यामुळे हा विषय चटकन मार्गी लागू शकतो. त्यामुळे गुहागर शहर शिवसेनेतर्फे आम्ही सह्यांची मोहिम राबविणार आहोत. अशी माहिती शहरप्रमुख नीलेश मोरे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला नगरपंचायत सभापती नीलिमा गुरव, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी सचिन जाधव, तालुका अधिकारी अमरदीप परचुरे, शहर अधिकारी राकेश साखरकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रदीप सुर्वे, शिव वाहतूक सेना शहर संघटक सुरज सुर्वे, सिद्धीविनायक जाधव, सारिका कनगुटकर, विनायक बारटक्के, प्रवीण रहाटे, दिलीप गुरव, बाबू गुहागरकर, समील कनगुटकर, कल्पेश बागकर, वीरेश बागकर, आदी उपस्थित होते.