सातत्यपूर्ण उपक्रमांमधून दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणारी संस्था
गेली 18 वर्ष सातत्याने गुहागर तालुक्यातील अपंगांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते झटत आहेत. 25 मार्च 2002 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने आज अनेक अपंगांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. 26 जानेवारी 2021 रोजी या संस्थेला पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील अपंग पुनर्वसन संस्थांसाठी कायमच प्रेरणा देणार्या संस्थेला हा मिळालेला हा पुरस्कार निश्चितच संस्थेच्या कार्याचा गौरव करणारा आहे.
25 मार्च 2002 ला गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेची स्थापना झाली. सुरवातीच्या काळात कोणताही साधा उपक्रम करायचा असला तरी या संस्थेला दुसर्यांसमोर हात पसरावे लागत होते. त्यावेळी अनेकांनी संस्थेची, पदाधिकार्यांची हेटाळणी केली होती. या हेटाळणीने खचून न जाता अपंगांनी अक्षरश: पायपीट करून संस्थेच्या कार्यक्रमांसाठी धन गोळा केले. स्थानिक पातळीवर अपंगांना मार्गदर्शन, वैद्यकीय तपासणी, अपंग दिन असे कार्यक्रम घेत या संस्थेने आपली विश्वासार्हता वाढवली. त्यामुळेच विविध कंपन्यांनी आपल्या फंडातून अपंगांसाठी कार्यक्रम घेताना गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला प्राधान्य दिले. त्यामुळे खर्चीक साहित्य (जयपूर फूट, वॉकिंग स्टीक, कुबड्या, व्हिलचेअर्स, वॉकर, तीन चाकी सायकल, कृत्रिम अवयव) अपंगांना सहजगत्या, अल्पमुल्यात उपलब्ध झाले.
अपंग वित्तीय महामंडळ, समाज कल्याण, एकात्मिक बालविकास आदी शासनांच्या विविध विभागांमधून अपंगांसाठी असलेल्या योजनांवरही या संस्थेने लक्ष्य केंद्रित केले. अपंगांना रोजगारासाठी या योजनांमधून कर्ज उपलब्ध करून दिले. काही अपंग सभासदांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मदतीचा हात दिला. अपंग विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देणे, यशप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करणे, तरुण अपंगांसाठी वधू वर सूचक मंडळ सुरू करणे असे अनेक उपक्रम, कार्यक्रम घेऊन अपंगांना प्रतिष्ठा देण्याचे काम या संस्थेने केले. आजवर गुहागर तालुक्यातील अपंग खेळाडूंना कधीच मैदान मिळाले नव्हते. हे लक्षात घेवून गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेने अपंग खेळाडूंच्या स्पर्धा भरविल्या. शासन स्तरावर होणार्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित केले. त्यामुळेच 1, 2 नव्हे तर तब्बल 13 खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत खेळु शकले.
कोरोनासारख्या अवघड संकटातही अपंग पुनवर्सन संस्था कार्यरत होेती. शासनाने अपंग कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचे ठरविले. योजनेचा पाठपुरावा करुन अनेक अपंगांना या योजनेचा लाभ संस्थेने मिळवून दिला. काही दानशूर लोकांना गाठून तालुक्यातील अपंगांना धान्य, साखर आदी वस्तूंचे वाटप केले. अपंगांच्या जीवनात येणार्या प्रत्येक अडचणीवर उपाय शोधण्याचे काम ही संस्था कायम करत आली आहे.
गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे हे कार्य पाहून मदनभाई सुरा या दानशूर व्यक्तीने संस्थेला 2 लाख 40 हजार रुपयांची देणगी दिली. या रक्कमेत संस्थेने कर्ज घेऊन 60 हजार रुपयांची भर टाकली. त्यातून मोडकाआगर पालशेत या मुख्य रस्त्यावर वरवेली येथे 30 गुंठे जमीन खरेदी केली. 30 गुंठे जागेत अपंग विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, अपंगांना उद्योग उभारणीसाठी जागा देणे असे उद्देश संस्थेने ठेवले. या वास्तूच्या भूमिपुजनासाठी दै. सागरचे संपादक कै. निशिकांत जोशी आले होते. यावरुनच संस्थेचा लौकिक समजतो. पदाधिकारी केवळ संकल्प करुन थांबले नाहीत भूमिपुजनानंतर येथे संस्थेचे कार्यालय, प्रशिक्षणासाठी, सभांसाठी सभागृह उभे राहिले.
आज ही वास्तू म्हणजे गुहागर तालुक्यातील अपंगांसाठी प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे, आत्मनिर्भर बनविणारे केंद्र बनले आहे. येथे केवळ सभा संमेलन होत नाहीत अपंगांना व्यवसायाभिमुख बनविण्याचे कार्य चालते. खर्या अर्थाने अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ही संस्था करत आहे. अपंग म्हणजे भार नसून संसाराचा भार पेलणारी व्यक्ती आहे. अपंगांना ही नवी ओळख देण्याचे काम गेली 18 वर्ष संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तन्मयतेने करत आहेत. या प्रवासात अनेकवेळा संकटे आली. त्या संकटांवर मात करण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले. आपल्या कार्याला समाजाचे पाठबळ मिळावे म्हणून विविध घटकांमधील मान्यवर व्यक्तींना त्यांनी संस्थेशी जोडले आहे. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेने गुहागर तालुक्याबरोबर अन्य तालुक्यातील अपंग व्यक्तींना, संस्थांनाही मदत केली. यशाचा मार्ग दाखविला. म्हणूनच प्रजासत्ताक दिनाला मिळालेला पुरस्कार जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अपंगांच्या संस्थांसाठी प्रेरणा देणारा आहे.