गुहागर : तालुक्यातील वडद येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले. यानंतर त्याची जंगलात मुक्तता करण्यात आली.
वडद (बन) परिसरात सोमण यांची विहीर आहे. सुमारे १५ फूट असणाऱ्या या विहिरीला ५ फुटापर्यंत पाणी आहे. गवा रेडा रात्रीच्या वेळी या विहिरीत पडला आणि अडकला. त्याला बाहेर पडता येत नव्हते. याच वेळी तेथील ग्रामस्थ केदार सोमण यांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने विभागीय वन अधिकारी चिपळूण यांना याबाबत माहिती दिली.
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रानवी वनरक्षक अरविंद मांडवकर, अडूर वनरक्षक संजय दुंडगे, मकरंद बागकर, मुसद्दीक कारभारी यांनी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गवा रेड्याला काढण्यासाठी मोहिम राबविली. गवा रेड्याला विहिरीतून कसे बाहेर काढता येईल, याचा अंदाज घेऊन व कल्पकता वापरून विहिरीला धरुन ५ फूटी खड्डा मारला आणि गव्याला चढता येईल असा रस्ता तयार केला. यानंतर सर्वांनी गव्याला बाहेर काढत त्याची सुटका केली.
फोटो : जीएचआर 6-2 विहिरीत अडकलेला गवा रेडा.
