गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पालशेत बंदर येथील जेटीजवळ शनिवारी (ता. 26) सकाळी एकाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची नोंद नापता आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती. मात्र हा मृतदेह संदेश हेदवकर यांच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करणाऱ्या बिहारमधील कामगारचा असल्याचे तपासात समोर आले. सदर कामगार छोट्या होडीतून मच्छीमार नौकेकडे जात असताना 25 डिसेंबरला रात्री समुद्रात पडला होता. याबाबतची अधिक माहिती अशी की, संदेश हेदवकर रा. पालशेत पोमेंडी फाटा यांचा मच्छीमारीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मल्हारी मार्तंड कृपासाई या मच्छीमार नौकेवर उचित रामदेव कोल (मुळ गाव सुराकुड, पो. ककवारा, जिल्हा बाका, बिहार) हा खलाशी म्हणून नोकरीला होता. 25 डिसेंबरला मच्छीमारी आटोपल्यावर खोल समुद्रात बोट नांगरण्यात आली. रात्री 10 च्या सुमारास उचित आणि दिनेश हे दोघे छोट्या होडीने आंघोळीसाठी पालशेत बंदरावर आले होते. तेथून पुन्हा छोट्या होडीने मच्छीमार नौकेकडे जात असताना उचित तोल जावून पाण्यात पडला. रात्री त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो आढळून आला नाही. शनिवारी (ता. 26 डिसेंबर) सकाळी त्याचा मृतदेह पालशेत जेटीजवळ सापडला. सुरवातील उचितची ओळख पटली नव्हती. मात्र अनोळखी मृतदेह समुद्रावर सापडल्याची बातमी संदेश हेदवकर यांच्यापर्यंत पोचल्यावर त्यांनी सदर मृतदेहाची ओळख पटवली. तसेच 25 डिसेंबरला रात्रीपासून उचित बेपत्ता असल्याची माहिती पोलीसांना दिली. गुहागर पोलीसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.