पाटपन्हाळे सरपंचाना पितृशोक
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार यांचे वडिल तात्या बा चुनीलाल पवार यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. वार्धक्यामुळे गेले काही महिने ते आजारी होते. त्याच्या पश्र्चात 3 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत कष्टात, भटकंतीमध्ये तारुण्य गेलेल्या तात्याबांना कर्तृत्ववान मुलामुळे वार्धक्यात हक्काचे घर पहात आले. (Father of Sanjay Pawar Expired)
आयुष्यभर भटकंती करुन पै पै जमा करायची आणि संसार उभा करायचा अशी रीतच बनलेल्या समाजातील तात्या पवार यांचा जन्म माखजन (ता. संगमेश्र्वर) जवळील कोंडिवरे येथे झाला. पालातच निवास, उन्हाळ्यात कोकण आणि पावसाळ्यात घाटमाथा हा आसरा, दगडफोडी, विहिरी खोदणे, रस्त्याचे काम करणे हे उदरनिर्वाहाचे साधन. अशा परिस्थितीत एकत्र कुटुंबात संसार सुरु असताना तात्याचा विवाह झाला. मुले झाली. पालात वयाने मोठे असल्याने स्वत:च्या मुलांबरोबरच पालातील अन्य मुलांमुळे तात्या सर्वांसाठीच तात्याबा झाले. (Father of Sanjay Pawar Expired)
गुहागर तालुक्यात कामे करताना त्यांनी आपला मुक्काम पालामधुन भाड्याच्या जागेत, चार भिंतीमध्ये हलविला. खऱ्या अर्थाने एक स्थैयाचे जीवन सुरु झाले. अहोरात्र कष्ट होते पण झोपायला छप्पर होतं. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची गाडी सुरु झाली. हळुहळु मुले कमावती झाली. शृंगारतळी परिसरात तात्याबांच्या परिवाराची ओळख तयार झाली. त्यांचा एक मुलगा संजय पवार पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाला. आर्थिक स्थैर्याबरोबरच हक्क घर हवं होतं. ते स्वप्नही पूर्ण झाले. आयुष्याच्या सत्तरीतील प्रवासात दोन टोकाचे जग तात्यांनी पाहिले. (Father of Sanjay Pawar Expired)
गेले काही महिने तात्या आजारी होते. तरुणपणी केलेले कष्टाचा परिणाम आयुष्याच्या उतरंडीला डोक वर काढु लागला. स्मृतीभ्रंश झाला. मुलांनी, सुनांनी सेवा केली. अखेर 16 जानेवारी 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला. (Father of Sanjay Pawar Expired)