10 हजाराची केली मागणी; राहूल कनगुटकर यांनी उघडकीस आणला प्रकार
गुहागर : गुहागर शहरानंतर आता असगोली येथील एका युवकाचे फेसबुक अकाउंट मंगळवारी रात्री हॅक करण्यात आले. हा अकाउंटवरुन त्याच्या फेसबुक फ्रेंडकडे पैशाची मागणी हॅकर करत होता. मात्र राहुल कनगुटकर यांच्या सावधगिरीमुळे कोणाचीच फसवणूक झाली नाही. दरम्यान या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आलेली नाही.
गुहागर शहरातील पत्रकार मनोज बावधनकर, चिपळूण अर्बन बॅकेच संचालक अजय खातू आणि वेलदूरचे अमोद गोळे यांची फेसबुक अकाउंट महिनाभरापूर्वी हॅक झाली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. 8) रात्री 9.30 वा. असगोली गावातील एका युवकाचे फेसबुक अकाउंट याच पध्दतीने हॅक झाले. त्याच्या अकाउंटवरुन असगोलीतील राहूल कनगुटकर यांच्या मेसेंजरवर संदेश आला. या संदेशामध्ये मला डॉक्टरला देण्यासाठी 10 हजार रुपयांची गरज आहे. तातडीने पैसे माझ्या गुगल पे किंवा फोन पे वर टाकावे. असे हिंदीमध्ये लिहिले होते. हा संदेश फेसबुक मेसेंजरवर सुरु असतानाच राहुल कनगुटकर यांनी हा प्रकार संबंधित फेसबुक हॅक झालेल्या युवकाला सांगितला. त्यावेळी सदर युवकाने मोबाईल बंद असल्याने फेसबुक बघितले नसल्याचे सांगितले. हे लक्षात येताच राहुल कनगुटकर यांनी हँकरला सांगितले की, मी गुगल पेवर पैसे ट्रान्स्फर करत नाही. आपला बॅक अकाउंट असेल तर पाठवा, मी पैसे लगेच पाठवितो, असे सांगताच त्या हॅकरने आपला 7099174674 हा मोबाईल नंबर पाठविला. त्यानंतर मेसेंजरवर संदेश येणे बंद झाले. यानंतर राहूल कनगुटकर यांनी असगोलीतील ग्रामस्थांना घडलेला प्रकार निदर्शनास आणून दिला. असा संदेश आल्यास कोणीही पैसे पाठवू नका असेही सांगितले. त्यामुळे हॅकरकडून होणारी फसवणूक थांबली.