विचार व्यासपीठ – शिक्षण (शाळा) कसे सुरु व्हावे ? लेख २
कोरोना या विषाणूजन्य व संसर्गजन्य अशा आजाराची सुरुवात चीन देशात हुबई प्रांतात वुहान या शहरात डिसेंबर २०१९ ला झाल्याचे टिव्हीवर पहायला मिळाले. या आजाराची भयानकता पाहून मनाचा थरकाप होत होता. ८ मार्चला कोरोना भारतात केरळमध्ये दाखल झाला. आपल्या पर्यंत तर हा आजार येणार नाही ना ? ही शंका मनात येते न येते तोच ९ मार्चला पुण्यात व लगेचच १९ मार्चला आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तोपर्यंत शासनाने लॉकडाऊन केले. आपल्या शाळाही बंद करण्यात आल्या. इतिहासात पहिल्यांदा जग थांबले.
सुरूवातीचे काही दिवस तर अगदी भितीदायक वातावरणात गेले. यातून फक्त जीवन सुरक्षित राहू दे एवढेच सर्वांना वाटत होते. नंतर मात्र सततच्या घरात कोंडून घेण्याला लोक कंटाळले आणि हळूहळू बाहेर पडायची सुरुवात झाली. भिती कमी झाली. टिव्ही चँनेल वर चर्चा सुरू झाल्या. आता लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे आता अनलॉक करा. ही मागणी पुढे येवू लागली. त्यातच भर म्हणून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय ? याबाबतही टिव्हीवर चर्चा सुरू झाल्या. आतातर जवळजवळ सहा महिने झाले आहेत. सर्व कारखाने, उद्योगधंदे, कार्यालये, बाजारपेठाही काही निकष पाळून सुरू झाल्या. पण शाळा मात्र बंद आहेत. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. असा सूर ऐकायला मिळत आहे. म्हणूनच या मनोगताद्वारे हेच सांगायचे आहे की, शाळा निश्चितच बंद आहेत. ती काळाची गरज आहे. पण विद्यार्थ्यांचे शिक्षण नियमितपणे सुरू आहे.शासनाच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली , जिल्हा व तालुका शिक्षण विभाग आपल्या शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना विविध मार्गाने शिक्षण देण्यासाठी सर्वोतोपरी यशस्वी प्रयत्न करीत आहे.
खरेतर शाळा मार्चच्या मध्यावर बंद झाल्या. मार्च अखेरपर्यंत सर्व पाठ्यक्रम शिकवून पूर्ण झालेला असतो. एप्रिलच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात उजळणी घेतली जाते. नंतर द्वितीय सत्राची परीक्षा घेऊन मे मध्ये सुट्टी पडते. या शैक्षणिक वर्षात फक्त संकलीत मूल्यमापन झाले नाही. निकालाबाबत इतर सर्व बाबी पूर्ण झालेल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा प्रश्नच नव्हता. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू होते. १५ जून ते ३० जून या कालावधीत केवळ मागील वर्षाची उजळणी घेतली जाते. नवीन पाठ्यक्रम अध्यापनाची सुरुवात १ जुलै पासून होत असते. त्यामुळे आजवर प्रत्यक्षात केवळ दोन – तीन महिनेच तसे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षात दिसत आहे.
वास्तविक आज जागतिक महामारीचा विचार करता ” प्रथम जीवन व नंतर सर्वकाही ” असे अनेक विचारवंत सांगत आहेत. तरीही अगदी जून पासूनच शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव व संपूर्ण शालेय शिक्षण विभागाने या बंद कालावधीतही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ठोस उपाययोजना केली आहे. दिक्षा अँप ची निर्मिती करून इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमाचे इयत्तेनुसार व विषयानुसार संपूर्ण पाठाचे VDO उपलब्ध करून दिले आहेत. तसेच नियमितपणे दररोजचा अभ्यास दिला जात आहे. या अभ्यासमालिकेचे १५० भाग पूर्ण झाले आहेत. JIO TV चे चँनेल सूरु करण्यात आले आहे. या चँनेलवरून नियमितपणे शैक्षणिक प्रसारण करण्यात येत आहे. तसेच सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली सारखे कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.तसेच अनेक तंत्रस्नेही शिक्षकांना प्रोत्साहन देऊन अनेक अँप्स, यु ट्युब चँनेल, तसेच दैनिक माझा अभ्यास, आजचा अभ्यास , मिशन स्काँलरशिप या PDF तसेच VDO यांची निर्मिती करून ते केंद्र व शाळास्तरावर पाठवले जात आहेत. शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे इयत्तेनुसार whatsapp गृप तयार केले आहेत .ही सर्व शैक्षणिक सामग्री शिक्षक या गृपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पाठवीत आहेत. ई – लर्निंग च्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. ज्या गावात कोरोनाचे पेशंट नाहीत अशा गावात शिक्षक सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन प्रत्यक्ष शिक्षण देत आहेत. शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण प्रवाहात जरी ठेवले तरी पुरेसे असताना आपल्या राज्यात व विशेषतः आपल्या जिल्ह्यात कितीतरी पटीने शिक्षण प्रक्रिया सुरू असल्याचे दिसत आहे. अगदी गुहागर तालुक्यात तर शैक्षणिक कामकाजाचा नियमित आढावा घेत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवीताला महत्त्व न देता त्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा गळा काढणाऱ्या काही अत्यंत गंभीर पालकांनी या अत्यंत कठीण परिस्थितीत शाळा बंद असल्या तरीही शिक्षण अखंडपणे सुरू ठेवणाऱ्या शिक्षण विभागाच्या कार्याकडे डोळसपणे पहायला हवे.
आँनलाईन शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन नाहीत, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, पालकांना रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत अशाही बाबीही चर्चेला येतात. हे १०० % खरे आहे. मात्र यावरही अपवाद वगळता शिक्षकांनी उपाययोजना केलेली दिसून येत आहे.शासन शाळा सुरू करण्यासाठी घाई करत आहे. शासन शाळा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या तारखा देत आहे. असाही सूर ऐकायला मिळतो मात्र ते केवळ पालकांना शांत ठेवण्यासाठी आहे. शिक्षण विभाग अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम करत असल्याची शासनाची खात्री आहे. विद्यार्थ्यांचे नुकसानही होत नसल्याचे ठाम मत आहे. त्यामुळे सध्या घाई न करता शाळा योग्य परिस्थिती आल्यावरच शासन शाळा सुरू करेल. असे तज्ञांचे मत आहे.
आजवर शासनाने शाळा व शिक्षणाबाबत अत्यंत योग्य निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांना घरी बसून शक्य तितके शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. शिक्षकही कोरोना योद्धा म्हणून काम करत असतानाच आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मेहनत घेत आहेत. शिक्षण प्रक्रिया या नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्या दिवसापासून सुरु आहे. विद्यार्थ्यांना नियोजित शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके पोच केली गेली आहेत. मे महिन्याचाही शालेय पोषण आहार घरपोच दिला आहे. यासह विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. अर्थातच शाळा बंद आहेत मात्र शिक्षणाचा नंदादीप अखंड तेवत आहे.
– सुहास गायकवाड, गुहागर (राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक)
विचार व्यासपीठ – शिक्षण (शाळा) कसे सुरु व्हावे ?
20 मार्च पासून पाच महिने बंद असलेल्या शाळा आता क्रमश: सुरु करण्याचा विचार शासन करत आहे. त्याचवेळी कोकणात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी शाळा सुरु करणे योग्य आहे की अयोग्य. कोरोनासोबत आपण जगायला शिकतोय. व्यवहार पुर्वपदावर येण्यासाठी धडपडतोय. याच पध्दतीने शिक्षण क्षेत्रातही बदल व्हावेत असे वाटते का. कोणते बदल मुलांना शिक्षणाकडे पुन्हा घेवून जावू शकेल. ग्रामीण भागात आजही इंटरनेट उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण आपल्याकडे प्रभावशील होवू शकत नाही. त्याला शाळा व्यतिरिक्त कोणते पर्याय ग्रामीण भागातील शिक्षणासाठी उपयोगी ठरु शकतात. याबद्दल आपली मते समजुन घेण्यासाठी हे व्यासपीठ गुहागर न्युज उपलब्ध करुन देत आहे. आपण आपले लेख guhagarnews2020@gmail.com या इमेल वर पाठवावेत.