डॉ. प्रविण मुंढेंची झाली जळगाव पोलीस अधिक्षक पदी बदली
गुहागर : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली जळगांव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी अहेरी, गडचिरोली येथे अपर पोलीस अधिक्षक म्हणून काम पहाणारे डॉ. मोहित कुमार गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 17 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे पोलीस अधिक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या.
डॉ. मोहित कुमार गर्ग हे गडचिरोली जिल्ह्यात 16 जून 2019 पासून अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) म्हणून काम करीत होते. पंजाब राज्यातील धुरी या गावातून आलेले डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे शालेय शिक्षण सर्वहितकारी विद्या मंदिर, धुरी येथे झाले. ते 2012 मध्ये डॉक्टर झाले. त्यानंतर 2014 पर्यंत त्यांनी ग्रामीण वैद्यकिय अधिकारी म्हणून काम पाहिले. 2013 ते 2015 इंडियन रेव्हीन्यू सर्व्हिसेस मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून ते कार्यरत होते. 2015 मध्ये भारतीय पोलीस दलात आले. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीतील नक्षलवाद प्रभावी क्षेत्रात मतदान जनजागरण मोहिमेत त्यांनी प्रभावी काम केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे सध्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली जळगांव जिल्ह्याचे अधिक्षक म्हणून झाली आहे. डॉ. मुंढे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस दलासाठी राबवलेल्या रिफ्रेशमेंट ट्रेनिंग या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले होते. परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी ता. गंगाखेड मधील डॉ. प्रविण व्यंकटराव मुंढे यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण हिंगोली जिल्ह्यातील बसमतनगरच्या जवाहर नवोदय विद्यालयात झाले. नवी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम पूर्ण केला. 2012 मध्ये ते आयपीएस झाले. त्यांचे पहिले पोस्टींग पुण्याच्या वहातूक शाखेत झाले. त्यानंतर धुळेचे पोलीस अधिक्षक म्हणूनही ते कार्यरत होते. रत्नागिरीत पोलीस जिल्हा अधिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी अवैध धंद्यांवर केलेली कारवाई सर्वश्रुत आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईत थेट जमीनीवर उतरुन लढताना त्यांना अनेकांनी पाहिले आहे.
गुहागर न्युज तर्फे दोन्ही अधिकाऱ्यांच्या त्याच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !