गुहागर : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे दाभोळ खाडीतील सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. सेवेला पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी पहावयास मिळत आहे.
दापोलीचे माजी आमदार डॉक्टर चंद्रकांत मोकल व डॉक्टर योगेश मोकल या पिता-पुत्रांनी कोकणच्या पर्यटन वाढीसाठी आर्थिक तोटा सहन करून दाभोळ – धोपावे खाडीमध्ये फेरीबोट सेवा सुरू केली आहे. उत्तम नियोजन आणि विनम्र सेवेच्या जोरावर सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्विसेस प्रा. लि. च्या माध्यमातून आजपर्यंत विविध ठिकाणी चालवण्यासाठी सातवी फेरीबोट स्थानिकांच्या व पर्यटकांच्या सेवेत रुजू केली आहे. रत्नागिरी व रायगड जिल्हे जोडले गेले आहेत. गेली सात ते आठ महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरात अडकून राहिलेले लॉकडाऊनला मिळालेली शिथिलता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. गुहागर, दापोली तालुक्याच्या समुद्र किनार्यावर पर्यटकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे. यामुळे कोरोनामुळे ठप्प झालेल्या आर्थिक विकासाला गती निर्माण झाली आहे. मोकल यांच्या फेरीबोट सेवेमुळे पर्यटक महामार्गाने जाण्यापेक्षा किनारपट्टीवरील प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना भेटी देत गुहागर व दापोली दाखल होत आहे. २४ तास सुरू असणाऱ्या दळणवळण सुविधेबरोबर वेळ, पैसा, इंधन बचत होत आहे. सलग असलेल्या सुट्यांमुळे फेरीबोटीला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या दिसत आहेत.