गुहागर : कोरोना लॉकडाऊनमधील शिथिलता, पर्यटन हंगामाला प्रारंभ आणि दिवाळीची सुट्टी असल्याने गुहागर तालुक्यात पर्यटकांचा प्रचंड ओघ वाढला आहे. गुहागर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.
गेले ८ महिने महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असलेला गुहागर तालुक्यात पर्यटक दिसून येत नव्हता. सर्व हॉटेल, लॉजिंग, घरगुती खानावळी, घरगुती राहण्याचे ठिकाणे ओस पडली होती. याचा सर्वाधिक फटका याठिकाणी काम करणाऱ्या सर्वसामान्यांना बसला होता. काम नसल्याने घरात उपासमारीची वेळ आली होती.
गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना संसर्ग कमी झाल्याने लॉकडाउनमध्ये आलेली शिथिलता यामुळे मुंबई, पुणे व घाटमाथ्यावरील पर्यटक दिवाळीनिमित्ताने गुहागरात दाखल झाले आहेत. दिवाळीची सुट्टी व त्यास लागून आलेला रविवार यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या असंख्य नागरिकांना आपल्या कुटुंबासह मोकळा श्वास घेण्यासाठी गुहागरचा रस्ता धरला आहे.
तालुक्यातील गुहागर समुद्रकिनारा, वेळणेश्वर, हेदवी समुद्र किनारी पर्यटकांनी गर्दी केलेली पहावयास मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेल्या पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे.