१३ डॉक्टरांचा पुढाकार, अत्यल्प शुल्कात अद्ययावत सुविधा
गुहागर : कोविड रुग्णांसाठी खासगी, 25 बेडचे कोविड केअर सेंटर शृंगारतळीत सुरु झाले आहे. प्रशस्त खोल्या, 24 तास डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफची उपलब्धता, ऑक्सिजनची सुविधा, ऑक्सिजनची व्यवस्था असलेली रुग्णवाहिका, चहा, नाश्ता व शाकाहारी जेवण, या सुविधा शृंगारतळी कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध होणार आहेत. प्रति दिन केवळ 4 हजार ते 5 हजार 500 इतक्या कमी शुल्कात रुग्णावर उपचार केले जाणार आहेत.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर येथे शासनाने मार्च महिन्यात कोविड केअर सेंटर सुरु केले. परंतु वाढत्या कोरोनामुळे गुहागरमध्ये आणखी एका कोविड उपचारकेंद्राची आवश्यकता होती. गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीमधील रेनबो लॉज येथे खासगी कोविड केअर सेंटर आजपासून सुरु झाले आहे. या कोविड केअर सेंटरच्या उभारणीत डॉ. राजेंद्र पवार, डॉ. सौ. विनिता नातू, डॉ. सतिश देवस्थळी, डॉ. सौ. स्मिता बळवंत, डॉ. मंदार आठवले, डॉ. अनिकेत गोळे, डॉ. संदिप जाधव, डॉ. जरार साल्हे, डॉ. प्रमोद हंचाटे, डॉ. श्रीकांत मडके, डॉ. सुरेश भाले, डॉ. सन्मान बेलवलकर, डॉ. प्रशांत काळे या डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
रेनबो लॉजमधील प्रशस्त, हवेशीर खोल्यांमध्ये कोविड रुग्णाला ठेवण्यात येणार आहे. रुग्णाच्या बेडरुमजवळ आणखी एक स्वतंत्र मिटींग रुमही आहे. अत्यावश्यक प्रसंगी, कोविड सेंटर व्यवस्थापनाच्या परवानगीने येथे रुग्णाचे नातेवाईकही राहु शकतात. तसेच खोलीलाच जोडून स्नान आणि स्वच्छता गृहाची सुविधा आहे. त्यामुळे 24 तास रुग्णाला गरम पाणी उपलब्ध असणार आहे.
आजपर्यंत तालुक्यात ऑक्सिजनची सुविधा नसल्याने कोरोनाग्रस्ताला अन्य तालुक्यातील रुग्णालयात संदर्भित केले जायचे. मात्र या कोविड केअर सेंटरमध्ये 10 ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड आहेत. अद्ययावत ऑक्सिजन कन्व्हर्टर मशीन येथे आहे. शिवाय 20 ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय आणि धावपळ टळणार आहे. आत्पतकालीन परिस्थितीत अधिक उपचारासाठी रुग्णाला अन्य ठिकाणी न्यायचे असेल तर स्वतंत्र ऑक्सिजनची सुविधा असलेली रुग्णवाहिकाही येथे उपलब्ध असणार आहे.
या उपचार केंद्रात शासनांने ठरवून दिलेल्या नियमांनुसार दर आकारले जाणार आहेत. प्रतिदिन सामान्य स्थितीत 4 हजार व ऑक्सिजनची गरज भासल्याच 5 हजार 500 इतक्या अत्यल्प शुल्कात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामध्ये औषधोपचार, दिवसातून तीन वेळा रुग्ण तपासणी, चहा नाश्ता भोजन, निवास या सुविधांचा समावेश आहे. शिवाय रक्त तपासणी, तज्ञ डॉक्टरची उपलब्धता, सेल्फ केअर कीट, ऑक्सिजन सुविधेसह रुग्णवाहिका या सुविधाही स्वतंत्र शुल्क घेवून रुग्णाला उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
डॉक्टरांनी केली पदरमोड
गुहागर तालुक्यात चांगले कोविड केअर सेंटर व्हावे यासाठी डॉक्टरांनी आपला खिसा खाली केला आहे. सुरवातीची गुंतवणूक म्हणून सुमारे २० लाख रुपयांचे भांडवल डॉक्टरांनी उभे केले. तर शृंगारतळीमधील काही दानशुर व्यक्तिंनीही या कोविड केअर सेंटरसाठी अर्थसाह्य केले आहे. त्यामधुन अनेक आवश्यक सुविधांची उपलब्धता करण्यात आली आहे.
नर्स नाहीतच
लॉकडाऊननंतर बेरोजगारीचा प्रश्र्न आवासून उभा आहे. कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्यासाठी या खासगी कोविड केअर सेंटरला चार प्रशिक्षित नर्सची आवश्यकता होती. मात्र कोरानाच्या भितीने एकाही नर्सची उपलब्धता तालुक्यातून होवू शकली नाही. त्यामुळे मुंबईहून चार नर्सना या कोविड केअर सेंटरमध्ये नोकरी देण्यात आली आहे.