गुहागर, ता. 11 : तालुक्यातील श्रृंगारतळीमधील कोरोना तपासणी केंद्रात पॉझिटिव्ह निदान झालेल्या, दिवसभर उपाशी असलेल्या रुग्णांना अखेर सायंकाळी ७ नंतर धरणाच्या बाजुने जंगलातून असलेल्या रस्त्यावरुन चालत गुहागरला यावे लागेल. या कालावधीत रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र आजपर्यंत कौतुकास पात्र असलेल्या कोरोना योद्धे या रुग्णांच्या मदतीला धावून आले नाहीत.
गुहागर शहरातील 7 व्यक्ती कोरोना रुग्णाच्या संपर्कात होते. याची माहिती आशा सेविकेने बुधवारी (दि. 9 सप्टेंबर) आरोग्य विभागाला दिली होती. पण या 7 व्यक्ती व अन्य 5 व्यक्तीअशा 12 जणांना रुग्णवाहिकेने शुक्रवारी (दि. 11 सप्टेंबर रोजी) सकाळी 10 वाजता कोरोना चाचणीसाठी शृंगारतळीमधील वेळंब फाट्याजवळ असलेल्या तपासणी केंद्रात नेण्यात आले. तेथे गर्दी असल्याने या सर्वांच्या तपासणीसाठी दुपारचे 2.30 वाजले. केवळ तपासणी करायची असल्याने या मंडळींनी सोबत खाण्याचे डबे नेले नव्हते. दोन बाटल्यांमधील पाणी केव्हाच संपून गेले होते. तपासणीचा निकाल ३ वा. लागला. त्यावेळी एकाच घरातील 4 व्यक्ती कोराना पॉझिटिव्ह असल्याचे कळले. यामध्ये एका महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे. निदान झाल्यावर या चार जणांना सोडून उर्वरित निगेटिव्ह निदान झालेल्या 8 जणांना गुहागरला सोडण्यासाठी रुग्णवाहिका निघुन गेली. तुम्हाला नंतर सोडण्यात येईल असे चालकाने सांगितले. मात्र सायंकाळी 6 वाजले तरी रुग्णवाहिकेचा पत्ता नव्हता. या मंडळींनी तपासणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. काहीवेळाने तपासणी केंद्रातील अधिकारी कर्मचारीही निघुन गेले. पण त्यांच्यापैकी एकानेही या चारजणांची विचारपूस केली नाही. फोनाफोनी झाल्यावर कळले की, नादुरस्त झाल्याने चालकाने चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उभी केली आहे. चालकाने हेतूपुरस्परपणे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आम्हाला टाळले का असा प्रश्र्न या रुग्णांच्या मनात आला. म्हणून पुन्हा तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. वाडकर मॅडम आदीजवळ संपर्क साधण्यात आला. परंतु तेथूनही सकारात्मक उत्तर आले नाही. अखेर तपासणी केंद्रावरुन चालत ही मंडळी शृंगारतळीपर्यंत पोचली.
सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोटात अन्नाचा कण नव्हता. शृंगारतळीत काहीतरी खायला मिळेल अशा आशा होती. पण आजपासून तळी बाजारपेठ बंद झाल्याने तेथेही काही खायला मिळाले नाही. अर्धा पाऊणतास एस.टी., अन्य वाहन येईल आणि आपण गुहागरला पोचू या आशेवर ही मंडळी बसस्टॉपवर थांबली. पण गुहागरला जाणारे एकही वाहन आले नाही. अखेर सर्वांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. गुहागरला येण्यासाठी मोडकाआगरकडून जाणारा मार्गच जवळ होता. त्यामुळे मंडळी गुहागरच्या दिशेने चालु लागली. धरणावरील पुलाचे काम चालु असल्याने राजमार्ग बंद होता. धरणाच्या बाजुने वरवेलीत जाणारा रस्ता सायंकाळनंतर धोकादायक असतो. हा रस्ता जंगलातून जात असल्याने सायंकाळी गवे, अन्य वन्यप्राणी यांचा पाणवड्यावरील वावर सुरु होतो. तरीही घरी पोचण्यासाठी या मार्गाशिवाय पर्याय नव्हता. एकमेकांच्या साथीने, एकमेकांना धीर देत, मनातील भिती दूर करत त्यांनी हे अंतर पार केले. अखेर दोन तासांच्या पायपीटीनंतर महिलेसह तीन्ही कोरोनाग्रस्त घरी पोचले.
या घटनेने आरोग्य विभागातील कोरोना योद्धे असे का वागले हा प्रश्र्न निर्माण झाला आहे. गेले पाच महिने कोरोना विरुध्दची लढाई धीराने लढणाऱ्या योद्ध्यांमधील माणुसकीचा झरा का आटला. कोरोनाग्रस्त रुग्णांना नेण्याच्या वेळीच रुग्णवाहिका नादुरुस्त का झाली. अधिकाऱ्यांनी साह्य का केले नाही, तालुक्यातील प्रशासन कोरोना योद्ध्यांना मदत का करु शकले नाही. दुपारी ३ वाजल्यापासून कोरोनाग्रस्तांना वाऱ्यावर का सोडण्यात आले, अशा अनेक प्रश्र्नांची मालिका या घटनेने उभी राहीली आहे.