गुहागर : गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही संमतीसाठी स्थानिकांना दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या विरोधात पावरसाखरी येथील राजेश पालशेतकर यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील कोकण एलएनएजी प्रकल्पाद्वारे समुद्रात ब्रेकवॉटर वॉल बांधण्याचे कामाला सुरवात होणार आहे. या कामासाठी समुद्राच्या तळाशी विविध आकारातील आणि विविध वजनांचे दगड वापरून एक स्ट्रक्चरच तयार केले जाणार आहे. ते दगड मिळविण्यासाठी पवारसाखरी परिसरात या ठिकाणी सुमारे 14 लाख टन दगडाचे उत्खनन होणार आहे.
या उत्खननाला स्थानिकांनी आपला विरोध असल्याचे लेखी पत्र प्रशासनाला दिले आहे. पवारसाखरीत होणाऱ्या उत्खननामुळे आमच्या घरांना धोका निर्माण होणार आहे. खाणीमुळे या ठिकाणचे पाण्याचे स्रोत नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आमच्या मुळावर येणारे उत्खनन आम्हाला नको. अशी भूमिका स्थानिकांची आहे.
मात्र विरोध असतानाही खाणीला परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दमदाटी केली. असा दावा करत राजेश पालशेतकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.