कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनचा पुढाकार ; गुहागर बाग किनारी स्वच्छता मोहीम
गुहागर : कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनच्या केतन वरंडे व सुशांत निंबरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेसाठी युवावर्गाला आव्हान करून निसर्गसौंदर्याने नटलेला गुहागर वरचापाट बाग समुद्रकिनारा स्वच्छ केला. गुहागर तालुक्यात संपूर्ण कोकण किनारपट्टी प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून सर्व युवा वर्गाने या उपक्रमात काम करावे, असे आवाहन केतन वरंडे यांने केले आहे.
मुळात गुहागर समुद्रकिनारा स्वच्छ सुंदर आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सलग समुद्र चौपाटी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पावसामुळे समुद्री लाटांनी किनार्यावर प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या डिश, पाण्याच्या बाटल्या याचा समुद्रावर खच होतो. गुहागर पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. किनारे स्वच्छ असतील तर पर्यटकहि अशा किनार्याकडे आकर्षित होतो. हे ओळखून कोकणातील पर्यटन वाढला पाहिजे व समुद्रकिनारे प्लास्टिक मुक्त होण्यासाठी कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या केतन वरंडे व सुशांत निंबरे यांनी फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुहागर वरचापाट बाग समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आव्हान केले होते. त्यानुसार या स्वच्छता मोहिमेत गुहागर तालुक्यातील सुमारे ६० युवक-युवतींनी सहभागी होऊन संपूर्ण किनारा स्वच्छ केला. गोळा झालेल्या कचऱ्याची गुहागर नगरपंचायतीच्या कर्मचारी विल्हेवाट लावली.
गुहागरचे वाढते पर्यटन लक्षात घेता येत्या काळात तालुक्यातील अन्य समुद्रकिनारे महिन्यातून दोनवेळा स्वच्छ करण्याचा संकल्प आहे. गुहागरसह कोकण किनारपट्टी स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे केतन वरंडे यांने सांगितले.

