आरोग्य विभाग सतर्क; जनतेने घाबरून जाऊ नये वैद्यकीय अधिकार्यांचे आवाहन
गुहागर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरू असून तालुक्यामध्ये सुमारे ३० ते ४० रूग्ण दररोज सापडत आहेत. याचबरोबर वातावरणाच्या बदलामुळे सर्दी व तापाने अनेकजण हैराण झाले आहेत. आरोग्य विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने तालुक्यात आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करून धावपळ करावी लागत आहे.
गुहागर तालुक्यात सध्या कोरोना रूग्ण वाढत असतानाच सर्दी तापाची साथ जोरात सुरू आहे. कोरोनामुळे मढाळ, तवसाळ, अडूर, आरे पिंपळवट येथे रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. मढाळ गावामध्ये सध्या ताप व सर्दीची साथ जोरात आली असून आरोग्य विभाग मात्र सुस्त असल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मढाळ येथील चव्हाण वाडीमध्ये सर्दी तापाचे अनेक रूग्ण असल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.
तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये या साथीचा फैलाव होत असून नक्की सर्दी, ताप आहे की कोरोनाची लक्षणे यामध्ये संभ्रमावस्था झाली आहे. तालुक्यामध्ये सर्दी तापाची साथ आली असली व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी आम्ही आमचे कर्मचारी यांना योग्य सूचना देऊन सर्दी तापाची साथ कमी करण्याचे प्रयत्न करू, तालुक्यातील जनतेने कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये व सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी देविदास चरके यांनी केले आहे.