अपूर्व शारंगपाणी; दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल मिळाले युएन पदक
गुहागर : चिपळूणचा सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांना भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर बढती मिळाली आहे. शहरातील निवृत्त वायुसेना अधिकारी हेमंत भागवत यांच्यानंतर सैन्यदलात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळणारे शारंगपाणी दुसरे सैनिक आहेत. त्यामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातून अपूर्व शारंगपाणी यांचे अभिनंदन होत आहे. यापूर्वी लेफ्टनंट कर्नल असताना दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल त्यांना युएन पदकाने गौरविण्यात आले होते.
चिपळूणमधील नेत्र शल्य विशारद (कै.) डॉ. संजीव शारंगपाणी आणि सौ. अंजली शारंगपाणी यांचे सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण चिपळूणात झाले. त्यानंतर एनडीएची प्रवेश परीक्षा देवून त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलेट्री अकादमी मध्ये प्रवेश घेतला. सिकंदराबाद येथील आर्मिच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून ते मिलेट्री अभियंता बनले. नंतर पदव्युत्तर विशेष अभ्यासक्रमही पूर्ण केला. भारतीय सैन्यदलात कार्यरत असताना कुपवाडा, बारामुल्ला, लडाख, कारगिर, राजस्थान बॉर्डर, चंदीगड, झाशी, जोधपूर, बडोदा, अहमदाबाद आदी ठिकाणी ते लष्करी सेवत होते. वेलिंग्टन येथून त्यांनी विशेष लष्करी अधिकारी हे प्रशिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर त्यांना युनोच्या शांतीसेनेत काम करण्याची संधी मिळाली.
दक्षिण सुदानमध्ये युनायटेड नेशनतर्फे शांतता प्रस्थापित करणे आणि तेथील नागरिकांना संरक्षण देण्याचा उपक्रमात विविध देशांमधील सैनिकांसोबत भारतीय सैन्यदलातील 15 सैनिक सहभागी झाले होते. तेथील बोर अभयारण्यात सुमारे 2500 सुदानी नागरिकांना संरक्षण देण्याचे काम लेफ्टनंट कर्नल अपूर्व शारंगपाणी यांच्या टिमवर सोपविण्यात आले होते. तेथील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल लेफ्टनंट कर्नल अपूर्व शारंगपाणी आणि त्यांच्या सोबत असलेल्या 14 भारतीय सैनिकांना युएन मेडल देवून सन्मानित करण्यात आले. जनरल फ्रँक मुशो कामान्झी यांनी हा प्रतिष्ठेचा शांतता पुरस्कार देवून गौरविले. त्यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी गव्हर्नर ॲगोट ॲलियर यांनी भारतीय सैनिकांचे विशेष कौतुक केले. यावेळी भारताचे दक्षिण सुदानमधील राजदूर श्रीकुमार मेनन उपस्थित होते. ऐन दिवाळीत (ऑक्टोबर 2017 मध्ये) हा सन्मान मिळाला तेव्हाही चिपळूणमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता.
योगायोग असा की, आज तीन वर्षांनी (ऑक्टोबर 2020) पुन्हा एकदा अपूर्व शारंगपाणी यांचे अभिनंद करण्याची संधी चिपळूणकरांना प्राप्त झाली आहे. लेफ्टनंट कर्नल पदावरुन त्यांना कर्नल म्हणून बढती मिळाली आहे.