कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा
2.9.2020
गुहागर : तालुक्यातील वीज ग्राहकांना पाठवलेली भरमसाठ वीज बिले रद्द करावीत. असे निवेदन गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरणला दिले. यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.
पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर आणि प्रदेश उपाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली गुहागर महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले. शासनाने दिलेल्या आदेशांची पायमल्ली करून, मनमानीपणे महावितरणने वाढीव वीज बिले ग्राहकांना दिली आहेत. कोरोना संकटामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला. जनतेचा रोजगार बुडाला. अशावेळी वाढीव बिले देवून आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महावितरण करत आहे. ही बिले रद्द करावीत. याबाबत महावितरणकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वाहतूक गुहागर सचिव विनायक दणदणे, सह संपर्क अध्यक्ष नितिन कारकर, माजी तालुका अध्यक्ष राजेश शेटे, संतोष खांबे, कौस्तुभ कोपरकर, आदित्य मुकनाक आदी उपस्थित होते.