निसर्गमित्र अक्षय खरेंनी उलगडले चमकण्यामागचे रहस्य
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नववर्षस्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट पहायला मिळेल असा अंदाज आहे. मात्र निसर्गाचा हा आविष्कार पहाण्यासाठी किनाऱ्यावरील काळोख्या जागेत संयम बाळगून थांबावे लागेल. मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये या लाटेचे फोटो सहजी काढता येत नाहीत. त्यामुळे फोटोच्या नादात आनंद हरवून बसु नका अशी गुहागर न्युजची प्रेमळ विनंती आहे.
या लाटांबद्दल पूर्वी काही गैरसमज होते. खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाणाऱ्या बांधवांनी अनेक रात्री असे पेटलेले पाणी पाहिले आहे. पूर्वी या प्रकाराने मच्छीमार घाबरायचे. मच्छीमारांना याबद्दल काय वाटते तसेच या लाटेचे शास्त्रीय कारण काय याची माहिती देणारा हा लेख.
निळ्या रंगाने प्रकाशित झालेल्या पाण्याबद्दल बोलताना मंगेश तांडेल नावाचे मच्छीमार म्हणाले की, आज किनाऱ्याला दिसणाऱ्या निळ्या लाटा किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पूर्वी आम्ही काही वेळा समुद्रात देखील पहायचो. काजव्याप्रमाणे प्रकाश देणारे वेगळ्या प्रजातीचे मासे असतील. किंवा विजेचा करंट पाण्यात सोडणारे काही मासे असतात त्याच्यामुळे हा प्रकाश पडत असेल असे आम्हाला वाटायचे. म्हणून एकदा आम्ही या निळ्या प्रकाश असलेल्या पाण्यात जाळे टाकून मासे पकडण्याचाही प्रयत्न केला आहे. जाळे पाण्यातून बाहेर काढताना काही वेळ चमकत होते. मात्र त्या जाळ्यात काहीच हाताला लागले नाही. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. अखेर भितीपोटी अशा प्रकाशीत पाण्याकडे न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. बुजूर्ग मच्छीमार याला पेटणारे पाणी किंवा जाळ म्हणतात. अज्ञानापोटी या प्रकाराबाबत कुतुहल होते पण कारण समजत नव्हते.
गुहागर मधील निसर्गमित्र अक्षय खरे यांनी याचा अभ्यास केला आहे. ते म्हणाले की, गुहागरच्या समुद्रात दिसणाऱ्या या लाटांचा शोध आम्हाला 2015 मध्ये लागला. एका पक्षीमित्राबरोबर रात्रीच्या वेळी समुद्रावर थांबलो होतो त्यावेळी चमकणाऱ्या लाटा पहिल्यांदा आम्ही पाहिल्या. त्याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की, समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक सुक्ष्म जीव असतात. ते समुहाने रहातात. त्यापैकी काही सुक्ष्म जीवांमध्ये घर्षणानंतर स्वयंप्रकाशीत होण्याची क्षमता असते. त्याला बायोल्युमिनियस प्लॅकटन (bioluminescence plankton) असे म्हणतात. ठराविक वातावरणात (थंड) ज्यावेळी सुक्ष्म जीवांचे एखाद्या वस्तूबरोबर घर्षण होते त्यावेळी ते प्रकाशीत होते. समुद्राच्या पाण्यात काठी मारली, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटेत जोरात पाय आपटला तरीही ते प्रकाशीत झालेले पहायला मिळतात. साधारणपणे फेब्रुवारी अखेरपर्यंत, थंडी राहिल्यास मार्च पर्यंत हे दृष्य आपण समुद्रकिनाऱ्यावर पाहू शकतो. मळभट वातावरणात, किंवा उन्हाळ्यात हा प्रकार दिसत नाही.
समुद्रातील जीवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापिका सौ. स्वप्नजा मोहिते (मत्स्यमहाविद्यालय, शिरगांव, ता. रत्नागिरी) म्हणाल्या की, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा निळ्या रंगाने प्रकाशित करणाऱ्या या सुक्ष्मजीवांना प्लवंग असे मराठीत म्हटले जाते. त्यांचे जीवशास्त्रीय नाव नॉकटील्युका (noctiluca) असे आहे. हे सुक्ष्म प्लवंग समुद्रात कायम असतात. अनेकवेळा ते समुद्राच्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर येतात. ते जेव्हा एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात . या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश (bioluminescence) निर्माण करण्याची क्षमता असते. यामुळे किनाऱ्यावर येऊन जेव्हा लाटा फुटतात तेव्हा ते प्रकाशमान होतात आणि संपूर्ण लाट उजळून जाते. विशिष्ट वातावरणात, तापमानात ते प्रकाशमान होतात.