गुहागर, ता. 02 : मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिवशी गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर यांनी दिली आहे.
६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यासंदर्भात पत्रकार संघाची सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये रक्तदान शिबिराचा प्रस्ताव अमोल पवार यांनी मांडला. कोरोनाचे संकट, सलग तीन महिने असलेली टाळेबंदी यामुळे देशातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेवून विविध संस्था संघटना रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहेत. त्यामुळे गुहागर तालुका पत्रकार संघानेही सामाजिक बांधिलकी स्विकारत रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. असे मत अमोल पवार यांनी मांडले. या प्रस्तावाला आदित्य घुमे यांनी अनुमोदन दिले. सर्वांनुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.
सदर रक्तदान शिबिर, गुहागर शहरातील कै. इंदिरा वासुदेव सभागृह, भंडारी भवन, किर्तनवाडी रस्ता येथे 6 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे. डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयाच्या श्री स्वामी समर्थ रक्तपेढीतर्फे रक्तसंकलन करण्यात येणार आहे. तरी गुहागर तालुकावासीयांनी या रक्तदान शिबिरात येवून रक्तदान करावे. असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूरेश पाटणकर यांनी केले आहे.