रत्नागिरी येथे ८ रोजी निदर्शने
गुहागर : गुहागर तालुक्यातील आबलोली येथे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात ओबीसी आरक्षण संदर्भात महत्वाची सभा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ( गुहागर ) संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. रामचंद्र हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तालुक्यातील सर्व समाजातील बांधवांची उपस्थिती होती. ओबीसी आरक्षण लढा अधिक तीव्र करण्यासाठी ८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागरचे अध्यक्ष कृष्णा वणे यांनी प्रास्ताविक करताना ओबीसी प्रवर्गामध्ये येणा-या सर्व जाती, जमातींची तपशीलवार माहिती देऊन दि. ८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन व निदर्शने याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर द्यावयाच्या निवेदनाची प्रत तालुक्यातील एकुण १३ समाजाच्या प्रमूख प्रतिनीधींना देण्यात आली. या निवेदनाचे तपशीलवार वाचन कुणबी समाजोन्नती संघ गुहागर तालुका चिटणीस तुकाराम निवाते यांनी केले.
यावेळी कुणबी, भंडारी, तेली, गुरव, सोनार, कोष्टी समाजातील प्रतिनिधी मंगेश मोरे, निलेश सुर्वे, शशिकांत पवार, रमेश नेटके, सौ. पूजा कारेकर, चंद्रकांत पागडे, संतोष सोलकर, संतोष मोरे, गुहागर नगराध्यक्ष राजेश बेंडल, माजी सभापती विलास वाघे, संतोष गुरव, विलास गुरव यांनी मार्गदर्शन केले. गंगाराम पाष्टे यांनी ओबीसीच्या अभेद्य संघटनेची नितांत गरज असून सामाजिक न्याय्य मागण्या पदरात पाडून घेताना अपेक्षीत यश प्राप्त करू असे मत त्यांनी मांडले.ओबीसी आरक्षण संदर्भातील तालुका संघर्ष समिती गठीत करून या समितीत ओबीसी मधील सर्व समाजांचे प्रत्येकी दोन प्रतिनीधी घेण्यात येऊन निमंत्रक म्हणून पांडूरंग पाते यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात रामचंद्र हुमणे यांनी ओबीसींनी एकजुटीने एकसंघ राहून अविरत वाटचाल केली तर ओबीसींना सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्रांती घडविता येईल आणि ती काळाची गरज ठरेल यासाठी सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे. तसेच ओबीसींचा लढा हा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. त्यामुळे या लढ्यात जाणकार बुजुर्गांसह तरूणांचा सहभाग महत्वाचा आहे असे आवाहन त्यांनी केले.