वानर आणि रान रेड्याना उपद्रवी प्राणी म्हणून घोषीत करा; शेतकऱ्यांची मागणी
गुहागर : गुहागर मधील अनेक ग्रामीण भागात रान रेडे आणि वानरांचा वाढता उपद्रव तालुक्यातील बागायतदार आणि शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास रानरेडे व वानर हिरावून घेत असल्याच्या हजारो तक्रारी प्रशासनाकडे जात आहेत. मात्र यावर कायमचा उपाय काय असा संतप्त सवाल शेतकरी, बागायतदार वन विभागाला विचारत आहेत.
केरळ राज्याच्या धर्तीवर राज्यातही वानर आणि रान रेड्यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषीत करा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
वाढत्या जंगल तोडीमुळे वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. अश्या असंख्य घटना दिवसागणिक समोर येत आहेत. मात्र यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे.
हंगामी शेती करून पावटा, कुळीथ, तुर यांसह विविध प्रकारच्या भाज्यांची बागायत करणारे शेतकरी रान रेडे आणि वानरांच्या उपद्रवामुळे मागील सात ते आठ वर्षात भात शेती करण्यासाठी देखील धास्तावले असल्याचे चित्र घटलेल्या शेतीमधून स्पष्ट होतंय. यात प्रामुख्याने कोतळुक, वेळंब, कौंढर, मळण, या गावात तर आता हंगामी शेतीच दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे वानर आणि रान रेडे यांच्या बाबतीत राज्य सरकारने कायमचा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रान रेडे किंवा अन्य जंगली प्राण्यांनी शेती किंवा फळ झाडांचे नुकसान केले तर एका झाडाला सरकार कडून झाडामागे पाचशे रुपये दिले जातात. त्यात शेतकऱ्याचे मोठं नुकसान होत. बागायतीसाठी लाखो रुपये खर्च करून देखील त्यातून काहीही नफा न येता प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बागायतदार देखील प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
नुकताच रविवारी पालपेणे येथील मधली वाडीमध्ये जंगलात रानरेडा दिसून आल्यामुळे या भागातील बागायतदार देखील चिंतेत असून येथील युवा उद्योजक उमेश खैर यांनी वस्तीच्या शेजारी बिनधास्तपणे वावरणाऱ्या रान रेड्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून जीवापलिकडे जपलेल्या बागायतीबाबत चिंता व्यक्त केली.
