गुहागर : रायगड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार सुनील तटकरे 30 मे 2019 नंतर आज प्रथमच गुहागरमध्ये येत आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी विजयी खासदार तटकरे गुहागरमध्ये येतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्साह देतील. २००९ पासून रोवला गेलेला राष्ट्रवादीचा झेंडा दिमाखात येथे फडकत राहण्यासाठी मार्गदर्शन करतील. अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतू खासदार सुनील तटकरेंचा प्रचार दौरा खेड, दापोलीपर्यंत येवून थांबायचा. अखेर तब्बल 16 महिन्यांनी कार्यकर्त्यांची अपेक्षा पूर्ण होत आहे. 30 मेच्या आभारसभेनंतर आज (मंगळवार, ता. 13) खासदार सुनील तटकरे गुहागरला येत आहेत.
16 महिन्यांपूर्वी मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा मुद्दाच इथले खासदार (मा. अनंत गीते) कधी दिसत नाहीत हा होता. अनंत गीतेंवर टिका करताना निष्क्रीय खासदार, न दिसणारा खासदार आदी मुद्दे प्रचार सभांमधुन गाजले. तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी मतदार संघातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात सुनील तटकरेंच्या प्रचारसभांचे आयोजन केले. तरी देखील लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या खासदार सुनील तटकरेंना गुहागर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही. अनंत गीतेंना 2280 चे मताधिक्य मिळाले. (2014 च्या निवडणुकीत याच मतदारसंघाने सुनील तटकरेंना 2110 मताधिक्य दिले होते.)
लागोपाठ ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेतर्फे निवडणुक लढवली. आपल्या विजयाच्या घोडदौडीत खांद्याला खांदा लावून लढणारा मित्र शिवसेनेतून निवडणूक लढवत असल्याने कदाचित सुनील तटकरेंनी येथील निवडणुकीकडे पाठ फिरवली असावी. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणेही बदलली. शिवसेना (55 आमदार), काँग्रेस (51) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (48) हे तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. शिवसेनाआमदार भास्कर जाधव सत्तेतील सहकारी, अनुभवी, अभ्यासू, क्रीयाशील आमदार असल्याने ते गुहागरमधील समस्या सोडविण्यास सक्षम आहेत. असे समजून खासदार सुनील तटकरेंनी गुहागरला येणे टाळले असावे.
मात्र या 16 महिन्यात गुहागर मतदारसंघातील वाडी वाडीत उभा राहीलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता क्षीण झाला. वास्तविक हा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा होता, आहे. आमदार भास्कर समर्थक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत शिवसेनेत निघुन गेले होते. त्यामुळे जे राहीले ते निष्ठावान हे लक्षात घेवून त्यांना बळ देण्यासाठी, उत्साह देण्यासाठी, पक्ष संघटन वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम नेतृत्त्वाची आवश्यकता होती. हे नेतृत्त्व खासदार सुनील तटकरेंसारखा अनुभवी नेता नक्की करेल. हा विश्र्वास त्यांना होता. म्हणूनच येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आमचे खासदार सुनील तटकरे केव्हा गुहागरला येतात याकडे डोळे लावून बसला होता.परंतु वारंवार दापोली, खेडपर्यंत येणाऱ्या खासदारांचा दौरा गुहागरकडे सरकतच नव्हता.
अखेर 16 महिन्यांनी खासदार तटकरे येणाऱ्या या माहितीने येथील राष्ट्रवादीत उत्साह निर्माण झाला आहे. पक्ष संघटने अंतर्गत तालुकाध्यक्ष पदाची निवड करणे, सर्वांना पक्षवाढीसाठी काही काम देणे अशी कामे पुढील काळात करायची आहेत. याशिवाय गुहागर मतदारसंघातील समस्या, मागण्या यांचाही आढावा घ्यायचा आहे. खासदार असल्याने स्वाभाविकपणे येथील प्रशासनाचा आढावा घेणे, त्यांच्या समस्या समजून घेणे अशी अनेक कामे खासदार तटकरे यांना करायची आहेत. यातील किती गोष्टींना मंगळवारचा एक दिवस पुरणार हा प्रश्र्न आहेच. त्यामुळे उद्याच्या काही तासांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले आहे.