कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ
गुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१९ एप्रिल २०२१ पर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेले काही दिवस तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक रितीने वाढत आहे. आबलोली बाजारपेठेत दवाखाना, बॅंक, पतसंस्था, पोस्ट, महावितरण, शाळा, महाविद्यालय आदी कामांसह बाजारहाट करण्यासाठी परीसरातील सुमारे २५ गावातील लोकांची ये-जा असते. योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदींबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सुचना देण्यात येत आहेत मात्र कोरोना चाचणीच्या मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आबलोली बाजारपेठ परीसरात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यात काही व्यापारी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून दुपारपर्यंत फक्त औषधांची दुकाने उघडी राहणार आहेत. तसेच खाजगी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असून त्यानंतर परीस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. बाजारपेठ सुरू झाली तरी फक्त अत्यावश्यक सेवा पुरविणारीच दुकाने उघडली जातील तसेच त्यांच्या जवळ कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे. – महेश भाटकर – पोलीस पाटील, आबलोली